पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटणारे पुरंदरचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पवार यांचे ऐकेकाळचे राजकीय वैरी अनंतराव थोपटे यांची बुधवारी भेट घेतली. जुन्या गोष्टी विसरू नका, साथ द्या, असे आवाहन शिवतारे यांनी केले. या भेटीमुळे बारामती लोकसभेच्या राजकारणात नवा रंग भरला आहे. दरम्यान, थोपटे कुटुंबिया काय भूमिका घेतात, याबाबतही उत्सुकता असून निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर शिवतारे ठाम असल्याने बारामतीची निवडणूक तिरंगी होणार असल्याचे दिसत आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघ हा कुणाचा सातबारा नाही. गेली ५० वर्षे आम्ही तुम्हाला निवडून देतो आहे. ‘तू कसा निवडून येतोस तेच पाहतो’, असे म्हणणाऱ्या अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत शिवतारे यांनी अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटत बारामती लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. त्यामुळे महायुतीमध्ये वाद सुरू झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शिवतारे यांना शांत राहण्याची सूचना केली होती. मात्र त्यानंतरही शिवतारे निवडणूक लढविण्यावर ठाम असून त्यांनी बुधवारी पवार यांचे कट्टर राजकीय वैरी माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीची चर्चा बारामतीच्या राजकारणात सुरू झाली आहे.

हेही वाचा >>>‘शिरूर’मधून आढळराव पाटील ‘राष्ट्रवादी’चे उमेदवार; दिल्ली दौऱ्यानंतर अधिकृत घोषणेची अजित पवार यांची स्पष्टोक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पवार कुटुंबियांसाठी बारामतीची लढत प्रतिष्ठेची झाली आहे. बारामतीची लढत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा अशी होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यानुसार काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांनी माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची भेट घेतली होती. तर शरद पवार यांच्या उपस्थितीत सुळे यांच्यासाठी भोर येथे मेळावा झाला होता. त्यानंतर शिवतारे यांनी थोपटे यांची भेट घेतल्याने थोपटे कुटुंबियांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

आम्हीही आरे ला कारे करू शकतो

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांना आवाहन केले आहे. ऐकायचे की नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आम्हीही आरे ला कारे करू शकतो. महायुतीमधील वातावरण खराब न करता आम्हाला निवडणुकीला सामोरे जायचे आहे. कायदा सुव्यवस्था ठेवून निवडणूक पार पाडायच्या आहेत, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.