पुणे : नॅक मूल्यांकन करून न घेतलेल्या महाविद्यालयांवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कारवाईचा बडगा उगारला आहे. नॅक मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या पूर्वपरवानगीशिवाय २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात प्रथम वर्षाचे प्रवेश करू नयेत, असे स्पष्ट आदेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांना दिले आहेत.

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले. नॅक मूल्यांकन ही अनिवार्य प्रक्रिया असूनही राज्यातील अनेक महाविद्यालयांनी एकदाही नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन करून घेतले नसल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या उच्च शिक्षण संचालकांनी नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांनी प्रथम वर्षाचे प्रवेश करू नयेत, विद्यापीठांनी संबंधित महाविद्यायांची संलग्नता रद्द करण्याचे निर्देश परिपत्रकाद्वारे दिले होते. या परिपत्रकानुसार विद्यापीठानेही २५ मे रोजी संलग्न महाविद्यालयांना या संदर्भातील सूचना दिल्या होत्या.

हेही वाचा >>> बालगंधर्व रंगमंदिराच्या दुरुस्तीला मुहूर्त; नाट्यकर्मींच्या टिकेनंतर महापालिकेला जाग

तसेच महाविद्यालयांनी मूल्यांकन प्रक्रिये संदर्भातील माहिती विद्यापीठ प्रशासनाला सादर करण्याबाबत स्पष्ट केले होते. मात्र महाविद्यालयांनी अद्याप मूल्यांकन करून घेतलेले नाही. त्यानंतर आता विद्यापीठाकडून प्रथम वर्षाचे प्रवेश न करण्याबाबत आदेश देण्यात आले. आतापर्यंत एकदाही नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन, एनबीए मानांकन न केलेल्या मान्यताप्राप्त महाविद्यालयांनी आणि परिसंस्थांनी विद्यापीठाच्या पूर्वपरवानगीशिवाय २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात प्रथम वर्षाचे प्रवेश करू नयेत. प्रवेश केल्यास त्याची जबाबदारी संस्था, प्राचार्य, संचालक, महाविद्यालयांची असेल, असेही स्पष्ट करण्यात आले.

Story img Loader