पुणे : लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला राज्यात मोठा फटका बसला. त्यामुळे सतर्क झालेल्या भाजपने आगामी विधानसभेसाठी गेल्या काही महिन्यांपासून रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून प्रत्येक लोकसभा मतदार संघात नेत्यांची नियुक्ती करून त्या मतदारसंघाची संपूर्ण जबाबदारी या नेत्यांकडे देण्यात आली आहे.

पुण्यातून लोकसभा लढलेल्या आणि पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होऊन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदी वर्णी लागलेल्या मुरलीधर मोहोळ यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. पुणे लोकसभा मतदार संघातील तीन विधानसभा मतदार संघाची जबाबदारी मोहोळ यांच्याकडे देण्यात आले असून यामध्ये कसबा, पर्वती आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. मोहोळ यांच्याकडे देण्यात आलेल्या या जबाबदारीमुळे त्यांची पक्षातील वजन वाढले असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा…गणेशोत्सवात सडक सख्याहरींना चाप, सडक सख्याहरींची छायाचित्रे चौकात लावणार; पोलीस आयुक्तांचा इशारा

लोकसभा निवडणुकीत जोरदार फटका बसल्यानंतर विधानसभेमध्ये अधिकाधिक जागा महायुतीच्या माध्यमातून मिळविण्याचा संकल्प भाजपने सोडला आहे. यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. राज्यातील प्रमुख नेत्यांना विधानसभा मतदारसंघ वाटून दिले जाणार असून तेथे प्रत्यक्ष जाऊन या नेत्यांना पाहणी करत कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधावा लागणार आहे. मतदारसंघात जाऊन मतदार नावनोंदणी मोहीम, बूथ रचना, शासकीय कार्यक्रमांचा आढावा, महिलांचे कार्यक्रम, योजनांचा लाभार्थ्यांना कसा फायदा होईल आणि निवडणुकीच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व कामांचा आढावा घेणे, ही जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.

मोहोळ यांना दिलेल्या जबाबदारीमुळे त्यांनी नुकतीच कसबा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक घेत संवाद साधला. या बैठकीत त्यांनी आगामी विधानसभा निवडणुका, पार्टीचे धोरण यावर सविस्तर चर्चा केली. कसबा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची भूमिका जाणून घेत त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या. पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा…अवाजवी अनामत शुल्काला चाप; कमाल मर्यादा एफआरएकडून निश्चित

गमाविलेला बालेकिल्ला परत मिळवण्याचे मोहोळांसमोर आव्हान

पक्षाचा बालेकिल्ला अशी ओळख असलेला कसबा विधानसभा मतदारसंघ परत ताब्यात घेण्यासाठी आता भाजपने कंबर कसली आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत दीड वर्षापूर्वी भाजपच्या हातातून गेलेला हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर या मतदार संघाची जबाबदारी टाकण्यात आली आहे.

हेही वाचा…कन्हेरीत कुस्ती आखाड्यात युवा नेते जय पवार आणि युगेंद्र पवार समोरासमोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या ३२ वर्षांपासून या मतदार संघातून भाजपचाच उमेदवार विजयी होत आहे. दिवंगत खासदार गिरीश बापट यांनी अनेक वर्षे या मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रतिनिधित्व केले होते. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे विजयी झाले. पक्षाच्या बालेकिल्ल्यातच झालेला पराभव भाजपाच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये हा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भाजपने जोरदार रणनीती आखली आहे.