लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षामध्ये तीव्र चुरस निर्माण झाली असतानाच भाजपचे आजी-माजी आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकारी उमेदवार ठरविणार आहेत. त्यानुसार पक्षाच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यास सुरुवात केली असून त्याबाबचा अहवाल प्रदेश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना शुक्रवारी (१ मार्च) देण्यात येणार आहे. पुणे लोकसभेची निवडणुकीची तयारी भाजपकडून सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी प्रदेश भाजपने आमदार आशिष शेलार आणि मदन येरावार यांची नियुक्ती केली आहे.

हेही वाचा >>> रिलायन्स समूहाकडे सर्वाधिक ६५० कोटींची मिळकतकर थकबाकी; पुण्यात १,७४६ थकबाकीदारांकडून ५,१८२ कोटी देण्यास टाळाटाळ

यापूर्वी भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी सर्वेक्षण करून पक्षाची रणनीती निश्चित केली होती. त्यानंतरच्या टप्प्यामध्ये उमेदवार निश्चितीसाठी आजी-माजी खासदार, प्रमुख पदाधिकारी यांची मते जाणून घेण्यास सुरुवात झाली आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनामुळे निरीक्षक आशिष शेलार आणि येरावार यांना वेळ नसल्याने त्यांच्या वतीने कृपाशंकर सिंह आणि बाळासाहेब पाटील यांनी पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा >>> पुणे: निलेश राणे यांच्यासाठी महापालिकेच्या पायघड्या; अवघे २५ लाख भरल्यानंतर मिळकतकराची थकबाकी शून्य

भाजपच्या विविध आघाड्यांचे अध्यक्ष, मंडल अध्यक्ष अशा पदाधिकाऱ्यांबरोबर वैयक्तिक चर्चा करण्यात येणार आहे. उमेदवाराचे संघटन कौशल्य, वैयक्तिक संपर्क, निवडून येण्याची क्षमता या निकषांवर ही चर्चा होणार आहे. चर्चेनंतरचा अहवाल प्रदेश भाजपला शुक्रवारी देण्यात येणार आहे. प्रदेश भाजप स्तरावर चर्चा होऊन उमेदवाराचे नाव केंद्रीय संसदीय मंडळाला पाठविण्यात येईल आणि त्यानंतर उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाईल, अशी माहिती भाजप पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

भाजप नेते कृपाशंकर सिंह आणि बाळासाहेब पाटील यांनी निरीक्षक म्हणून पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारीसंदर्भात आजी-माजी खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. त्याबाबतचा गोपनीय अहवाल ते प्रदेश भाजपला देणार आहेत. – धीरज घाटे, शहराध्यक्ष, भाजप