पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे २४ कोटी ३२ लाख ४४ हजार ४८३ रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे. मोहोळ कुटुंबीयांवर १४ कोटी ८५ लाख ५७ हजार ८७७ रुपयांचे कर्ज आहे.

मोहोळ यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही बाब समोर आली आहे. मोहोळ आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे पाच कोटी २६ लाख ७६ हजार ७८८ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे, तर स्थावर मालमत्ता १९ कोटी पाच लाख ६७ हजार ६९५ रुपये अशी एकूण २४ कोटी ३२ लाख ४४ हजार ४८३ रुपयांची मालमत्ता आहे. मोहोळ यांच्यावर १३ कोटी ५८ लाख ६९ हजार ९७७ रुपये, तर पत्नीवर एक कोटी २६ लाख ८७ हजार ९०० रुपयांचे कर्ज आहे. मोहोळ यांच्याकडे पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील मुठा, कासार आंबोली आणि भूगाव, सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात येरूली येथे शेतजमीन आहे. पत्नीकडे मुळशी तालुक्यातील दासवे येथे शेतजमीन आहे.

हेही वाचा…शिवाजीराव आढळराव यांच्या मालमत्तेत सहा कोटींनी वाढ

मोहोळ यांच्याकडे कोथरूडमध्ये चार, तर पत्नीकडे देखील कोथरूडमध्ये दोन वाणिज्यिक इमारती आहेत. मोहोळ यांच्याकडे कोथरूड येथे बंगला, कोथरूडमध्येच सदनिका आहे. मोहोळ यांनी शेती, व्यवसाय आणि भाडे यातून उत्पन्न मिळाल्याचे दाखविले आहे. मोहोळ यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून कला शाखेची पदवी घेतली आहे.

हेही वाचा…पाण्याअभावी स्ट्रॉबेरीचा हंगाम आटोपला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मोहोळ यांचे वार्षिक उत्पन्न ११ लाख ४७ हजार ९० रुपये आहे. मोहोळ यांच्यावर तीन खटले दाखल आहेत. मोहोळ यांच्याकडे टोयोटा इनोव्हा क्रीस्टा ही चारचाकी आहे. मोहोळ यांच्याकडे दहा तोळे, तर पत्नीकडे २५ तोळे आणि दोन्ही मुलींकडे प्रत्येकी तीन तोळे सोने आहे. मोहोळ यांची विविध बांधकाम व्यावसायिकांबरोबर व्यवसायात भागिदारी असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.