पुणे : जांभळांचा हंगाम सुरू झाला असून गुजरातमधील जांभळांची बाजारात आवक सुरू झाली आहे. गुजरातपाठोपाठ कर्नाटकातील जांभळांची आवक येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे.
गुजरातमधील सौराष्ट्र परिसरातून जांभळांची आवक मार्केट यार्डातील फळबाजारात सुरू झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा गुजरातमधील जांभळांची आवक वाढली आहे. जांभळांचा हंगाम दरवर्षी एप्रिल महिन्यात सुरू होतो. जुलै महिन्यापर्यंत जांभळांचा हंगाम सुुरू असतो. गुजरातमधील जांभळे आकाराने मोठी असतात तसेच चवीला गोड असतात. गुजरातमधील जांभळांपाठोपाठ कर्नाटकातील जांभळे येत्या काही दिवसांत बाजारात दाखल होणार आहेत. कर्नाटकातील जांभळांची आवक तुरळक प्रमाणावर होत असल्याचे मार्केट यार्डातील जांभूळ व्यापारी माऊली आंबेकर आणि पांडुरंग सुपेकर यांनी दिली.
हेही वाचा >>> पुणे : अवकाळी नुकसानीपोटी ७० लाख ६९ हजारांची मदत
जांभळांची लागवड गुजरात, कर्नाटक, तळकोकणातील सावंतवाडी भागात मोठ्या प्रमाणावर केली जाते. कर्नाटकातील जांभळांची आवक कमी झाल्यानंतर तळकोकणातील जांभळे बाजारात विक्रीस दाखल होतील. त्यानंतर पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यातील गावरान जांभळांची आवक सुरू होईल. गावरान जांभळांना चांगली मागणी असल्याचे त्यांनी नमूद केले.
मधुमेहावर जांभळे गुणकारी मानली जात असल्याने गेल्या काही वर्षांपासून जांभळाच्या मागणीत वाढ होत आहे. जांभळांपासून सरबतही तयार केले जाते. पर्यटनस्थळांवरून जांभळांना चांगली मागणी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जांभळांची लागवड चांगली झाली आहे. किरकोळ बाजारात एक किलो जांभळांची विक्री प्रतवारीनुसार १२० ते २५० रुपयांना केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.