रक्ताच कर्करोग असलेल्या तीन वर्षांच्या मुलाला ‘बोन मॅरो’ प्रत्यारोपणाची गरज आहे. त्याच्या रक्तातील मूळ पेशींशी जुळेल अशा दात्याचा शोध त्याचे आई-वडील घेत आहेत. दाता शोधण्यासाठी त्यांनी पुण्यात रविवारी एक मेळावा आयोजित केला आहे. रक्ताच्या काही विशिष्ट आजारांमध्ये रुग्णाला ‘बोन मॅरो प्रत्यारोपण’ करावे लागते. हे रक्तातील मूळ पेशींचे रोपण असते. रक्तगटाप्रमाणेच ‘ह्यूमन ल्यूकोसाइट अँटीजेन’ (एचएलए) हा एक गट असतो. रूग्णाचा आणि दात्याचा हा गट जुळणे आवश्यक असते. रुग्णाला सख्खे भाऊ-बहीण असतील, तर त्यांचा दाता म्हणून सर्वप्रथम विचार केला जातो. परंतु या तीन वर्षांच्या रुग्णास भाऊ-बहीण नाहीत. त्यानंतर आई, वडील आणि रक्ताचे नातेवाईक यांच्यात दाता शोधला जातो. त्यानुसार या रुग्णाच्याबाबतीत गौड सारस्वत ब्राह्मण समाजातील व्यक्तींना आपण मूळ पेशी दान करू शकतो का, याच्या तपासणीसाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. असे असले तरी केवळ विशिष्ट समाजातच नव्हे , तर त्याच्या बाहेरही दाता मिळू शकतो, अशी माहिती रूग्णाच्या आई-वडिलांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर दिली. संभाव्य दात्यांच्या तपासणीत केवळ त्यांच्या लाळेचा नमुना चाचणीसाठी घेतला जातो.

‘रोटरी क्लब ऑफ पुणे- पौड रस्ता’ आणि ‘दात्री स्टेम सेल रजिस्ट्री’ यांच्यातर्फे रविवारी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत कोथरूडमधील नवीन डीपी रस्ता येथे ऋग्वेद हॉटेलच्या समोर वेदामृत आयुर्वेदिक क्लिनिक येथे इच्छूक संभाव्य दात्यांच्या लाळेचा नमुना घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी रोटरी क्लबच्या दीप्ती पुजारी- ९९६७५००२४७\ ९८९२५९०८५२ किंवा डॉ. सुजाता कोतवाल- ९९२१९४०४७९ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.