पिंपरी : शहरात रोजगारासाठी आलेल्या बुलडाणा येथील दाम्पत्याच्या मुलाचे चिंचवड येथून अपहरण झाल्याची तक्रार दाखल होताच खंडणीविरोधी पथकाने दोन तासांत त्याची सुटका केली. त्यांच्याच गावातील ओळखीच्या व्यक्तीने मुलाचे अपहरण केल्याचे उघडकीस आले. मात्र, अपहरणामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

गजानन सुपडा पानपाटील (वय २५, रा. पुनई, जि. बुलडाणा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मुलाच्या आईने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलडाणा येथील दाम्पत्य काही दिवसांपूर्वी आठ वर्षांच्या मुलासह पिंपरी-चिंचवड शहरात कामासाठी आले होते. गजानन हा अपहृत मुलाच्या वडिलांच्या भावाचा मित्र आहे. गजानन हादेखील शहरात कामाच्या शोधात आला होता. मात्र, त्याला काम मिळाले नाही. मुलाचे आई-वडील हे दोघेही कामाला जातात. मुलगा घरीच राहत होता. त्या वेळी गजानन त्याच्याशी जवळीक साधत असे. मुलाला खाऊ देत असे. यापूर्वी एकदा त्याने मुलाला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मुलाच्या आईने मुलाला त्याच्या तावडीतून सोडविले होते. ३१ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता आरोपीने मुलाचे अपहरण केले.

मुलाच्या आईने मंगळवारी (१ एप्रिल) चिंचवड पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. अपहरणाची माहिती कळताच खंडणीविरोधी पथकाने तपासाला सुरुवात केली. पथकातील पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, आरोपीचे छायाचित्र आणि मोबाइल नंबर प्राप्त केला. तांत्रिक विश्लेषण केले असता, आरोपी अपहृत मुलाला रेल्वेने घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार भुसावळ पोलीस ठाणे, रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे पोलीस, भुसावळ रेल्वे स्थानक, मुक्ताईनगर, जळगाव, चाळीसगाव पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधून आरोपीची माहिती दिली. ‘सीसीटीव्ही’च्या फुटेजवरून रेल्वे पोलिसांनी आरोपीची शहानिशा करून काशी एक्सप्रेसमध्ये बसलेल्या आरोपीला ताब्यात घेऊन अपहृत मुलाची सुटका केली. खंडणीविरोधी पथकाचे फौजदार सुनील बदाने, पोलीस अंमलदार प्रदीप पोटे, ज्ञानेश्वर कुराडे यांनी चाळीसगाव पोलीस ठाणे येथे जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. फिर्यादी महिलेचे दुसरे लग्न झाले आहे. अपहृत मुलगा तिच्या पहिल्या पतीपासूनचा मुलगा आहे. तो आई आणि सावत्र वडिलांबरोबर राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलाचे अपहरण नेमके कोणत्या कारणासाठी झाले, हे अद्याप निष्पन्न झालेले नाही. – देवेंद्र चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खंडणीविरोधी पथक