डेक्कन जिमखाना भागातील बंगल्यात घरफोडी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी शयनगृहातील कपाट उचकटून परदेशी चलन, हिरेजडित सोन्याचे दागिने असा आठ लाख ५३ हजारांचा ऐवज लांबविला.
याबाबत एका महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेचे आई-वडील डेक्कन जिमखाना भागात राहायला आहेत. त्यांचा भाऊ एका बँकेत उच्चपदस्थ अधिकारी आहे. चार महिन्यांपूर्वी भावाची बदली मुंबईत झाली. त्यामुळे आई-वडील एकटेच बंगल्यात राहायला आहेत. चार दिवसांपूर्वी महिलेच्या भावाचे मुंबईत हदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यामुळे महिला आई-वडिलांना घेऊन मुंबईला गेली.
बंगला गेल्या चार दिवसांपासून बंद होता. चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश केला. मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून महागडे मनगटी घड्याळ, परदेशी चलन, हिरेजडीत सोन्याचे दागिने असा आठ लाख ५३ हजारांचा ऐवज लांबविला. घरफोडी झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव तपास करत आहेत.