काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या समारोपासाठी शहर काँग्रेसचे पदाधिकारी काश्मीर येथे दाखल झाले आहेत. दरम्यान, प्रमुख पदाधिकारी यात्रेच्या समारोपाला गेल्याने कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने काँग्रेसच्या पातळीवर पुढील दोन दिवस कोणतीही चर्चा होणार नसल्याचे स्पष्ट झाले असून महाविकास आघाडीची बैठकही लांबणीवर पडली आहे.
हेही वाचा >>>पुणे: मार्केट यार्डातील बेकायदा लिंबू विक्रेत्यांवर कारवाईच्या निषेधार्थ ‘दलित पॅंथर’चे आंदोलन
काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार संग्राम थोपटे, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, माजी आमदार दिप्ती चवधरी, माजी नगरसेवक अजित दरेकर, संगिता तिवारी, मेहबूब नदाफ हे काँग्रेसकडून काश्मीरसाठी रवाना झाले आहेत, अशी माहिती शहर काँग्रेसकडून देण्यात आली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या यात्रेचा सामारोप सोमवारी होणार आहे.
हेही वाचा >>>पुणे: राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या कार्यालयातील टेबल, खुर्च्या चोरीला; भांडार कक्षाचे कुलूप तोडून चोरी
कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यात येणार आहे. ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेकडून महाविकास आघाडी म्हणून लढविली जाणार आहे. त्यासंदर्भात या तिन्ही पक्षांची संयुक्त बैठक येत्या दोन दिवसांत होणार होती. मात्र काँग्रेस पदाधिकारीच यात्रेच्या समारोपाला गेल्याने ही बैठकही लांबणीवर पडली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस यावर कोणतीही चर्चा होणार नाही. तसेच कसब्याच्या निवडणुकीत महाविकास आघाडी होणार की नाही यावर आधी निर्णय घेतला जाणार आहे, त्यानंतरच काँग्रेसचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. यासाठी तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची येत्या आठवड्यात बैठक होऊन त्याचा निर्णय होईल. आघाडी झाली नाही तर कसब्यातील गणित मोठ्या प्रमाणात बदलणार आहेत.