पुणे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदाशिव पेठेतील कार्यालयाची तोडफोड करून कार्यकर्त्याला मारहाण केल्या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह २० ते ३० जणांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला.याबाबत ‘अभाविप’च्या कार्यकर्त्या संजीवनी कसबे (वय २०) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ‘मनविसे’चे पदाधिकाऱ्यांसह २० ते ३० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सोमवारी (१३ ऑक्टोबर) दुपारी साडेतीनच्या सुमारास सदाशिव पेठेतील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयात शिरले. अभाविपच्या कार्यालयातील कार्यकर्ते सार्थक वेळापुरे यांनी शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. कार्यालयाची तोडफोड करून त्यांनी अभाविपच्या कार्यालयातील भिंतीवर पत्रक चिकटवले. कार्यालयाला कुलूप लावून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तेथून निघून गेले, असे संजीवनी कसबे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार, सहायक निरीक्षक राजेश उसगावकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक सुरवसे तपास करत आहेत.

बंडगार्डन रस्त्यावरील वाडिया महाविद्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शाखा उद्घाटन कार्यक्रमाच्या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पत्रक लावल्या प्रकरणी दोन्ही संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. या घटनेनंतर सोमवारी ‘मनविसे’चे कार्यकर्ते अभाविपच्या कार्यालयात शिरले. त्यांनी घोषणाबाजी करुन ‘अभाविप’च्या कार्यालयात पत्रक चिटकविले, तसेच कार्यालयाची तोडफोड केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.