पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या आरोपातून पुरेशा पुराव्यांअभावी तीन आरोपींना पुणे सत्र न्यायालयाकडून दोषमुक्त करण्यात आले. त्यानंतर शंभर दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाने आरोपींच्या निर्दोष सुटकेच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल केलेले नाही. ते तातडीने दाखल करण्याची मागणी दाभोलकर कुटुंबीय आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने शनिवारी केली.

‘या आरोपींच्या गुन्ह्यातील सहभागाचा वाजवी संशय आहे. परंतु, विश्वासार्ह पुराव्यांद्वारा त्यांचा गुन्ह्यातील सहभाग सिद्ध करण्यात तपास यंत्रणा अयशस्वी ठरलेली आहे’, असे कठोर शब्द सत्र न्यायालयाने निकालपत्रात वापरल्यानंतर देखील सीबीआयकडून अजूनही अपील दाखल करण्यात आलेले नाही. सत्र न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष वेधण्यासाठी सीबीआयच्या मुख्य संचालकांच्या विचारार्थ निवेदन पाठवले आहे. त्याला सीबीआय कडून अजून प्रतिसाद देण्यात आलेला नाही. या खटल्यातील तीन आरोपींच्या निर्दोष सुटकेच्या विरोधात दाभोलकर कुटुंबीयांनी पीडित व्यक्तीचे कुटुंब या भूमिकेतून मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे, अशी माहिती डॉ. हमीद दाभोलकर आणि मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, राहुल थोरात, श्रीपाल ललवाणी यांनी दिली.

हेही वाचा : पुणे: फॅशन डिझाइनर निवेदिता साबू यांच्या वस्त्रदालनात चोरी करणारे तिघे गजाआड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. दाभोलकर यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवारी (२० ऑगस्ट) साने गुरुजी स्मारक येथे सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध गीतकार आणि ‘स्टँड अप कॉमेडीयन’ वरुण ग्रोव्हर यांचे ‘जिज्ञासा में जीवन’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. दाभोलकर यांच्या निधनानंतर राज्य सरकारने केलेला जादूटोणाविरोधी कायदा राष्ट्रीय पातळीवर मंजूर होण्याची मागणी महाराष्ट्रातील खासदारांनी करावी यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते खासदारांना ठिकठिकाणी भेटून निवेदन देतील.