काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे अविनाश भोसले यांच्या घरी सीबीआयने छापा टाकला आहे. पुण्यातील बाणेर येथील प्रासादतुल्य निवासस्थान आणि शहरातील इतर मालमत्तांवर ही कारवाई करण्यात आली आहे. सीबीआयच्या या छापेमारीमुळे राजकीय आणि बांधकाम क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. अविनाश भोसले यांची सीबीआयकडून सध्या कसून चौकशी केली जात आहे. भोसले यांच्यासह विनोद गोएंका आणि शाहीद बालवा यांच्यावरही सीबीआयकडून कारवाई केली जात आहे.

अविनाश भोसले हे एबीआयएल ग्रुप ऑफ कंपनीचे प्रमुख असून ते पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक म्हणून ओळखले जातात. त्यांचे महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांशी जवळचे संबध आहेत. ते अनेक राजकीय नेत्यांच्या संपर्कात असतात. काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम हे त्यांचे जावई आहेत. येस बँक आणि डीएचएफएल बँक गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई झाली असून मुंबई आणि पुण्यातील आठ ठिकाणी सीबीआयने छापे टाकले आहेत. डेक्कन जिमखाना तसेच गणेशखिंड रस्त्यावरील त्यांच्या बांधकाम कंपनीच्या कार्यालयाची देखील झडती घेतली जात आहे. काही महत्त्वाची कागदपत्रे सीबीआयने जप्त केली आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खरंतर, अलीकडेच रेडियस ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक संजय छाब्रिया यांना येस बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने अटक केली होती. त्यांच्या चौकशीत अविनाश भोसले यांचं नाव समोर आलं होतं. यातूनच अविनाश भोसले यांच्या घरी छापेमारी केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ईडीने यापूर्वी अविनाश भोसले यांच्यावर कारवाई केली आहे. एका कारवाई दरम्यान ईडीने त्यांची तब्बल ४० कोटींची संपत्ती जप्त केली होती. यामुळे आजच्या सीबीआय कारवाईमध्ये कोणती माहिती पुढे येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.