पिंपरी : औद्योगिक पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाकण नगरपरिषदेच्या स्थापनेनंतरच्या दुसऱ्या निवडणुकीत महायुतीमधील शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष आमने-सामने येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून भाजपला सोबत घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. भाजपला सोबत घेऊन शिवसेना (शिंदे) पक्षावर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सत्ता आणण्यासाठी माजी आमदार दिलीप मोहिते यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करण्यास ग्रामस्थ आणि सर्वपक्षीय नेत्यांनी तीव्र विरोध दर्शवल्यानंतर सहा एप्रिल २०१५ मध्ये चाकण नगरपरिषदेची स्थापना झाली. पहिल्याच निवडणुकीत तत्कालीन शिवसेना आणि तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच झाली होती. शिवसेनेचे आठ, राष्ट्रवादीचे सात, अपक्ष सहा आणि भाजपचा एक नगरसेवक निवडून आला होता. शिवसेनेने अपक्षांच्या मदतीने सत्ता काबीज केली होती.
माजी आमदार दिवंगत सुरेश गोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची सत्ता आली होती. गोरे यांना माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांची साथ मिळाली होती. आता आढळराव हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात आहेत. गोरे यांचे कुटुंबीय शिवसेना (शिंदे) पक्षात आहे. त्यामुळे माजी आमदार दिलीप मोहिते आणि गोरे कुटुंबीयाची प्रतिष्ठा पणाला लागणार असून, ते पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची येथे ताकद आहे. भाजपचे कार्यकर्ते आहेत. पण, सक्षम स्थानिक नेतृत्वाचा अभाव आहे. काँग्रेस अस्तित्वहीन आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. पण, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे स्थानिक पातळीकडे दुर्लक्ष होत असल्याचा सूर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे बाबाजी काळे आमदार असले, तरी त्यांचे चाकणकडे लक्ष नसल्याचे दिसून येते. त्यामुळे मागील वेळीप्रमाणे यंदाही शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातच लढत होईल, असे चित्र आहे.
मागील निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी माजी आमदार दिलीप मोहिते यांनी तयारी सुरू केली आहे. त्यासाठी भाजपला सोबत घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपच्या साथीने नगरपरिषदेची सत्ता मिळविण्याचे मोहिते यांचे प्रयत्न सुरू आहेत. नगरपरिषदेची निवडणूक घड्याळ चिन्हावर की स्थानिक आघाडी करून लढवयाची हे अद्याप ठरले नाही. मात्र, प्रचार सुरू केला आहे. मोहिते यांनी भाजपला सोबत घेण्याच्या हालचाली सुरू केल्यामुळे शिवसेना (शिंदे) पक्ष आणि गोरे कुटुंबीय काय भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
चौकट नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी चुरस चाकण नगरपरिषदेची स्थापन झाल्यानंतर ही दुसऱ्यांदा सार्वत्रिक निवडणूक होत आहे. नगराध्यक्षपद सर्वधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात चुरस निर्माण झाली आहे. दोन्ही पक्षांकडे इच्छुकांची मोठी संख्या असून, उमेदवार निश्चित करताना नेतृत्वाचा कस लागणार आहे.
प्रभाग १२, नगरसेवक २५
नगरपरिषद निवडणुकीसाठी १२ प्रभाग असून, २५ नगरसेवक आहेत. एक प्रभागातून तीन आणि ११ प्रभागांतून प्रत्येकी दोन नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. एकूण ३३ हजार १२५ मतदार आहेत. त्यात पुरुष १७ हजार २६२, महिला १५ हजार ८६२ आणि इतर एक मतदार आहेत.
