पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख रस्ते व चौक बंद राहणार असल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) ‘पीएमपी’च्या मार्गिकेत बदल करण्यात आले आहेत. शनिवारी (६ सप्टेंबर) अनंत चतुर्थीनिमित्त स्वारगेट मुख्य चौक आणि डेक्कन चौक बंद राहणार असल्यामुळे येथील बसस्थानकांवरील थांबे तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.

पीएमपीने दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट येथील शाहू महाराज स्थानक येथून सातारा रस्तामार्गे कात्रज व मार्केटयार्डकडे जाणाऱ्या पीएमपी लक्ष्मी नारायण येथून सुटणार आहेत. नटराज बस स्थानकातून सिंहगड रस्त्याकडे जाणाऱ्या बस पर्वती पायथा (स्वामी समर्थ मठ) येथून पुढे मार्गस्थ होतील. त्याचबरोबर पूलगेट व हडपसरकडे जाणाऱ्या पीएमपी वेगा सेंटर (स्वारगेट डेपो जवळ) येथून जातील, तर भवानी पेठ, नानापेठ आणि रास्ता पेठकडे जाणाऱ्या पीएमपी बस याच ठिकाणावरून चालवल्या जाणार आहेत.

डेक्कन जिमखाना स्थानकावरून कोथरूड डेपो, माळवाडी व एनडीए गेटकडे जाणाऱ्या बसेस एस.एन.डी.टी. कॉलेजजवळून मार्गस्थ होतील.गणेश विसर्जनाच्या दिवशी शिवाजी रोड, बाजीराव रोड, लक्ष्मी रोड, टिळक रोड आणि कर्वे रोड या प्रमुख मार्गांवर बस वाहतूक बंद राहणार आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तात्पुरते थांबे निश्चित करण्यात आले असून, त्यानुसार प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन पीएमपीचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांनी केले आहे.