लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : जागतिक स्तरावर प्रतिष्ठेच्या असलेल्या कान चित्रपट महोत्सवात पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचा (एफटीआयआय) लघुपट सर्वोत्कृष्ट ठरला आहे. संस्थेतील विद्यार्थी चिदानंद नाईक याचा ‘सनफ्लॉवर वेअर फर्स्ट वन्स टू नो’ हा लघुपट ‘ल सिनेफ’ या स्पर्धात्मक विभागात पहिल्या पारितोषिकाचा मानकरी ठरला आहे.

यंदा ७७वे वर्ष असलेला कान चित्रपट महोत्सव १५ ते २४ मे या कालावधीत झाला. जगभरातील चित्रपट प्रशिक्षण संस्थांतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महोत्सवात ‘ल सिनेफ’ हा अधिकृत स्पर्धात्मक विभाग आहे. यंदा या विभागात जगभरातील १८ लघुपटांची निवड करण्यात आली होती. त्यातील चार ॲनिमेशनपट आणि १४ लाइव्ह ॲक्शन लघुपट होते. एफटीआयआयमधील दूरचित्रवाणी विभागाचा विद्यार्थी चिदानंद नाईक दिग्दर्शित ‘सनफ्लॉवर वेअर फर्स्ट वन्स टू नो’ हा लघुपट या विभागातील एकमेव भारतीय लघुपट होता. स्पर्धेचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. त्यात ‘सनफ्लॉवर वेअर फर्स्ट वन्स टू नो’ हा लघुपट सर्वोत्कृष्ट ठरल्याचे जाहीर करण्यात आले.

आणखी वाचा-पुणे-मुंबई प्रवाशांचे पुढील आठवड्यात हाल! जाणून घ्या कोणत्या रेल्वे गाड्या रद्द…

दूरचित्रवाणी विभागप्रमुख डॉ. मिलिंद दामले म्हणाले, की विशेष म्हणजे दूरचित्रवाणी विभागातील एक वर्ष अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याच्या लघुपटाची कान महोत्सवात निवड होणे आणि त्याला पहिले पारितोषिक मिळणे हे पहिल्यांदाच घडले आहे. या एक वर्ष मुदतीच्या अभ्याक्रमात विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध पद्धतीने चित्रपट, दूरचित्रवाणी या माध्यमांविषयी शिकवले जाते. लघुपटाला मिळालेला एफटीआयआयच्या दृष्टीने ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे.