पुणे : ‘नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांच्यावर टीका करून नीतेश राणे यांनी चित्रफीत प्रसिद्ध केली होती, हे खरे आहे. त्यानंतर दाखल गुन्ह्याची चौकशी झाली. चौकशीअंती बडगुजर यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यांनी भाजपविरोधात निवडणूक लढवली. निवडणुकीनंतर त्यांनी पक्षात येण्याची इच्छा दाखवली. पक्षात येणाऱ्याचे स्वागत केले जाते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यांनी जुना इतिहास, वागण्याची पद्धत बाजूला ठेवून भाजपच्या नीती, नियमाने वागावे असा सल्लाही फडणवीस यांनी बडगुजर यांना दिला.
पक्षप्रवेशाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्यावर होती. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना सकाळी कल्पना नव्हती. प्रवेशाची माहिती मिळताच बावनकुळे हजर होते. संवादाचा अभाव राहिला, विरोध कोणाचा नव्हता, असे फडणवीस यावेळी म्हणाले.
गुन्हेमुक्तीबाबत साशंकता
● शिवसेनेच्या ठाकरे गटातून हकालपट्टी केलेले वादग्रस्त सुधाकर बडगुजर यांना पक्षात थाटामाटात प्रवेश दिल्याने राजकारणातील साधनशुचिता भाजपने गुंडाळून ठेवल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाच्या संकेतस्थळावर बडगुजर यांच्याविरुद्ध २२ वर्षांत २९ गुन्हे दाखल असल्याची माहिती अॅड. अतुल सानप यांनी दिली आहे.
● बडगुजर यांनी मागील विधानसभा निवडणुकीवेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याविरुद्ध चार खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. शहरातील मुंबई नाका, भद्रकाली, आडगाव, सरकारवाडा, अंबड या पोलीस ठाण्यांसह ग्रामीण भागातील घोटी पोलीस ठाण्यातही बडगुजर यांच्याविरुध्द गुन्हे दाखल आहेत. याशिवाय त्यांचा मुलगा दीपक बडगुजर याच्यावर पक्षाच्या पदाधिकाऱ्यास मारहाण करण्याचा गुन्हा दाखल आहे.
भाजपमध्ये प्रवेश झाला असल्याने विरोधकांच्या टीका टिप्पणीला आता पूर्णविराम मिळाला आहे. माझ्यावरील गुन्ह्यांच्या आरोपासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी उत्तर दिले आहे.–सुधाकर बडगुजर
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
माझ्या पक्षप्रवेशामुळे भाजप त्यावेळी अपवित्र होणार होती, पण शिवसेनेतून (उद्धव ठाकरे) हकालपट्टी केलेले बडगुजर यांना पक्षात घेऊन भाजप पवित्र झाली आहे का? –एकनाथ खडसे, आमदार राष्ट्रवादी (शरद पवार)