पुणे : करोना काळात आपण सगळे काम करत होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील काम करत होते. मात्र, त्या वेळी घरात बसून फेसबुक लाइव्ह करणारे आता मोदींवर टीका करत आहेत. आपण कोणावर टीका करत आहोत, काय बोलत आहोत, याचा विचार केला पाहिजे. मोदींची वक्रदृष्टी पडली, तर फेसबुक लाइव्ह करणाऱ्यांच्या तोंडाला फेस येईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली.

महायुतीच्या पुण्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात शिंदे यांनी ही टीका केली. या मेळाव्यात बोलताना अपशब्द जाणार नाहीत, याचे भान कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी ठेवावे, अशी सूचना अजित पवार यांनी केली. हा धागा पकडून शिंदे म्हणाले, की निवडणुकीत दररोज आरोप-प्रत्यारोप होतील. मात्र, आरोपांना विकासकामांनी उत्तर द्यायचे आहे. ‘हाथी चले बाजार तो…’ पुढील वाक्य मी पूर्ण करणार नाही, असे विधान करत मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली.

हेही वाचा >>>शरद पवार-धैर्यशील मोहिते पाटील भेटीनंतरही माढ्याची उमेदवारी गुलदस्त्यातच

महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या सत्ताकाळात राज्यात सुरू असलेली कामे वैयक्तिक अहंकारापोटी बंद करण्यात आली. त्या सरकारमध्ये मी आणि अजित पवारही होतो. राज्यकर्त्यांनी कधीही वैयक्तिक अहंकार बाळगायचा नसतो. अहंकाराची लंका मतदारच जाळून टाकणार आहेत. रावणाचाही याच पद्धतीने अंत झाला होता. काँग्रेसरूपी रावणाचा अंतही या निवडणुकीत होईल, असे शिंदे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पुण्यासाठी अण्णाच’

पुण्यात आता भाऊ, तात्या कोणी नाही. मुरली अण्णाच निवडून येतील. मोहोळ पैलवान होते. कोल्हापुरात ते सहा वर्षे शिकले. पैलवानाला कोणता डाव कधी टाकायचा, याची चांगली माहिती असते. त्यामुळे मोहोळ राजकीय आखाडा निश्चित मारतील. स्वार्थासाठी राजकीय आखाडा बदलणारा पैलवान मोहोळांपुढे टिकणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांवर टीका केली.