राज्यात थंडीचा कडाका ; उत्तर-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तीन दिवस गारठा

उत्तर-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सर्वच भागात पुढील तीन दिवस कडाक्याची थंडी पडणार आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

पुणे : उत्तर-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सर्वच भागात पुढील तीन दिवस कडाक्याची थंडी पडणार आहे. विशेषत: पुणे, नगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या शहरातील किमान तापमानाचा पारा कमालीचा घसरणार येणार आहे. मंगळवारी दिवसभरात राज्यातील किमान तापमानाची कमालीची घट झाली होती. थंडीची ही लाट शुक्रवापर्यंत (२८ फेब्रुवारी) राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उत्तर प्रदेशच्या उत्तर-पश्चिम भागावर पश्चिमी चक्रावात आणि चक्रीय स्थिती सक्रिय आहे. तसेच २९ जानेवारीला हिमालयाच्या भागात आणखी एक नवीन पश्चिमी चक्रावात धडकणार आहे. या पश्चिमी चक्रावाताचा प्रभाव तीव्र असून जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तरखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, ओडिसा, पंजाब, हरियाणा, दिल्ली, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, बिहार या राज्यांमध्ये दाट धुक्यासह कडाक्याची थंडी पडणार आहे. ही थंडीची लाट  पाच दिवस राहणार असून किमान तापमानाचा पारा तीन ते पाच अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरणार आहे.

मुंबईत थंडी कायम

मुंबईत गेले दोन दिवस जाणवणारी थंडी मंगळवारीही कायम राहिली. सांताक्रूझ येथे कमाल २७.८ अंश सेल्सिअस आणि किमान १३.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. दोन्हीमध्ये सरासरीच्या तुलनेत ३ अंशांची घट झाली होती. कुलाबा येथे २७.६ अंश सेल्सिअस कमाल तर १५.२ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. दोन्हीमध्ये सरासरीच्या तुलनेत अनुक्रमे २ आणि ४ अंशांची घट झाली होती.  सोमवारप्रमाणे मंगळवारीही माझगावच्या हवेने तीव्र प्रदूषण श्रेणीची मर्यादा ओलांडत ५०७ असा हवा गुणवत्ता निर्देशांक गाठला; मात्र सोमवारच्या तुलनेत हवेच्या गुणवत्तेत काही प्रमाणात सुधारणा झालेली दिसून आली. कुलाबा येथील हवेनेही सोमवारी तीव्र प्रदूषण श्रेणीची मर्यादा ओलांडली होती. मंगळवारी त्यात सुधारणा होत ३८६ असा अतिवाईट श्रेणीतील निर्देशांक नोंदवला गेला. भांडुप येथे ३०२, मालाड येथे ३४६, बोरिवली येथे ३६०, वांद्रे कुर्ला संकुल येथे ३०१, चेंबुर येथे ३२४ आणि अंधेरी येथे ३०७ असा हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवला गेला. त्यामुळे येथील हवा अतिवाईट श्रेणीत होती. वरळी येथील हवा २८३ निर्देशांकासह वाईट श्रेणीत होती.

नाशिकमध्ये ६.३ अंश

दिवसभरात सर्वात नीचांकी किमान तापमानाची नोंद नाशिक येथे ६.३ अंश सेल्सिअस, तर सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद २९.२ अंश सेल्सिअस सोलापुरात करण्यात आली. पुणे शहरात यंदाच्या हंगामातील सर्वात नीचांकी किमान तापमान ८.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तसेच मुंबईत १५.२ अंश सेल्सिअस, सांताक्रुझ १३.४, रत्नागिरी १४.१, नगर ७.९, कोल्हापूर १३.८, महाबळेश्वर ८.८, सांगली १३.५, सातारा १४, औरंगाबाद ८.८ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cold snap hailstorm north central maharashtra marathwada vidarbha ysh

Next Story
घरफोडीचे गुन्हे वाढीस; गुन्हे उघड होण्याचे प्रमाणही जेमतेमच
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी