पुणे : पुणे विमानतळ प्रशासनाने आंतरराष्ट्रीय विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन टर्मिनलमध्ये अत्याधुनिक सुविधायुक्त प्रतीक्षाकक्ष सुरू केला आहे. पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलच्या इमारतीत आंतरराष्ट्रीय सुरक्षा कक्षाच्या परिसरात ‘एलिजियन इंटरनॅशनल एक्झिक्युटिव्ह लाउंज’चे (प्रतीक्षा कक्ष) उद्घाटन केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले.

‘प्रतीक्षा कक्ष आधुनिक सोयीसुविधांयुक्त असून, वातानुकूलित सुविधा, आरामदायी बैठक व्यवस्था, निवडक रुचकर भोजन तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी खास सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या कक्षातील शांत वातावरण आंतरराष्ट्रीय उड्डाणांपूर्वी आराम करण्यासाठी किंवा व्यावसायिक कामानिमित्त बैठकांसाठी आदर्श ठरेल,’ असा दावाही मोहोळ यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन टर्मिनलमध्ये १० एअरोब्रिज, ३४ तपासणी केंद्रे आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाला अनुसरून अत्याधुनिक सुविधा आहेत. याला चार तारांकित मानांकन आहे. नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘एलिजियन इंटरनॅशनल एक्झिक्युटिव्ह लाउंज’मुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा प्रवास आणखी सुलभ होणार आहे,’ असे पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी सांगितले.