पुणे : पहिलीपासून हिंदी विषय शिकवण्यासाठी उपलब्ध शिक्षकच पात्र असल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे असल्याने हिंदीची सक्ती केवळ विद्यार्थ्यांवरच नाही, तर शिक्षकांवरही होणार आहे. त्याचा ताण येणार असल्याची शिक्षकांची भावना आहे.
शिक्षण विभागाने तिसऱ्या भाषेसंदर्भातील शासन निर्णयाचे शुद्धिपत्रक मंगळवारी रात्री प्रसिद्ध केले. त्यानुसार राज्य मंडळाशी संलग्न मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांत पहिली ते पाचवीसाठी हिंदी ही सर्वसाधारण भाषा असेल, तर हिंदी नको असल्यास काही अटींसह अन्य भारतीय भाषा शिकण्याचा पर्याय आहे. यावरून झालेल्या वादंगानंतर शिक्षण विभागाने दिलेल्या स्पष्टीकरणात, ‘उपलब्ध शिक्षक तांत्रिकदृष्ट्या पात्रता असल्यामुळे हिंदी विषय शिकविण्यासाठी नियुक्त करता येतील. मात्र, इतर भाषांसाठीची व्यवस्था करावी लागेल,’ असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे हिंदीसाठी स्वतंत्र शिक्षक दिले जाणार नाहीत. तर, इतर भारतीय भाषांसाठी स्वतंत्र शिक्षक देणे विद्यार्थिसंख्येवर अवलंबून असेल, हे स्पष्ट झाले आहे.
याबाबत शिक्षणशास्त्राचे अभ्यासक किशोर दरक म्हणाले, ‘जे शिक्षक मराठी शिकवतात, तेच हिंदी शिकवू शकतील, या गृहितकात अध्यापनशास्त्रीय विचाराचा अभाव आहे. नव्या वेळापत्रकात ऑनलाइनचा उल्लेखही नसल्याने हिंदीची सक्ती स्पष्ट दिसते. ‘राज्य अभ्यासक्रम आराखड्या’त मराठी व हिंदीच्या अभ्यासक्रमाची ध्येये एकसमान असल्याचे म्हटले आहे. मात्र, हिंदीच्या तासिका मराठीच्या निम्म्याच आहेत. याचा अर्थ शिक्षण विभागात कसलाही ताळमेळ नाही. ज्या अभ्यासक्रम आराखड्यामुळे राज्यात गेले वर्षभर शैक्षणिक अस्थिरता निर्माण झाली आहे, तो आराखडा विनाशर्त रद्द करावा. म्हणजे शिक्षणाशी प्रतारणा करण्याचा आणि लाखो बालकांच्या हक्कांची पायमल्ली करण्याचा दोष महाराष्ट्राला लागणार नाही.’
‘अध्यापनात तिसरी भाषा म्हणून हिंदीच्या समावेशामुळे शिक्षकांवर अतिरिक्त ताण नक्कीच येणार आहे. राज्याच्या भौगोलिक व सामाजिक परिस्थितीचा विचार केल्यास सर्वच ठिकाणी हिंदी विषय मुलांना समजेल, अशी स्थिती नाही. विशेषत: सीमा भागातील आणि आजही बोलीभाषेचा वापर होतो त्या ठिकाणी प्रथम भाषेची कौशल्ये, क्षमता तेथील विद्यार्थी प्राप्त करू शकत नसल्याचे विविध सर्वेक्षणांतून दिसून आले आहे. त्यासाठी शिक्षण विभागातर्फे विविध उपक्रम राबवले जात आहेत. हिंदी विषयाची काठिण्यपातळी इयत्तानिहाय वाढत जाईल. मात्र, विद्यार्थ्यांना अपेक्षित क्षमता प्राप्त करता येईल, असे नाही. त्याशिवाय मराठी माध्यमाचे विद्यार्थी इंग्रजी द्वितीय भाषा म्हणून शिकताना त्यांची आकलन क्षमता कमी असल्याचे दिसून येते,’ असे एका शिक्षकाने नाव न छापण्याच्या अटीवर स्पष्ट केले.
कोणीही हिंदी शिकवू शकेल, अशी धारणा दिसते. मुख्यतः कोणताही विषय शिकवण्यासाठी स्वतः शिक्षकाला समृद्ध होणे गरजेचे आहे. शालेय स्तरावर विविध शैक्षणिक कामे कमी करण्याची भूमिका वेळोवेळी शिक्षण विभाग मांडत असला, तरी कामे कमी होत नाहीत. तसेच, वेळापत्रक नियोजनात नवीन विषय वाढल्याने शिक्षकांवर अतिरिक्त ताण येणारच आहे. इयत्ता वाढत जाईल तसतसा ताणही वाढत जाईल. हा विषय या पूर्वीच्या वेळापत्रक नियोजनात नसल्याने अन्य विषयांच्या तासिका कमी कराव्या लागणार आहेत. – महेंद्र गणपुले, माजी मुख्याध्यापक, सुकाणू समिती सदस्य.