पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने मुरलीधर मोहोळ यांच्या रूपाने मराठा उमेदवार दिल्याने काँग्रेसकडून मराठा उमेदवार न देता ओबीसी उमेदवार दिला जाण्याची शक्यता काँग्रेस कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून, पुण्यातील निवडणूक महायुतीविरोधात महाविकास आघाडी अशी होणार आहे. महायुतीमध्ये पुणे मतदारसंघ भाजपकडे असून, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडे आहे. या दृष्टीने या दोन्ही पक्षांचे उमेदवार कोण असतील, याची चर्चा सुरू झाली असतानाच भाजपने माजी महापौर, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांचे नाव जाहीर करत आघाडी घेतली आहे. त्याउलट काँग्रेसच्या स्तरावर अद्यापही उमेदवार निश्चित झालेला नाही.

हेही वाचा…… तरीही तलाठी भरती रद्द का केली जात नाही? स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा सवाल

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे भाजपने मराठा उमेदवार दिल्याची चर्चा आहे. आगामी लोकसभा निवडणूक मराठा विरोधात मराठा उमेदवार अशी चर्चा असतानाच काँग्रेस ओबीसी उमेदवार देण्याची खेळी खेळण्याची शक्यता आहे. त्यामुळे यापूर्वी चर्चेत असलेली काही नावेही मागे पडल्याचे बोलले जात असून, काँग्रेसमधील जुन्या निष्ठावंताला संधी मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा…अजित पवारांचे बंधू सुप्रिया सुळेंच्या प्रचारात, श्रीनिवास पवार यांच्याकडे इंदापूर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसकडून निवडणुकीसाठी २० जण इच्छुक आहेत. या सर्वांच्या मुलाखतीही प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी घेतल्या आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत काँग्रेसकडून उमेदवाराची घोषणा केली जाईल, असा दावाही केला जात आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांची धास्ती वाढली असून, ओबीसी असलेल्या यातील कोणत्या इच्छुकाला संधी मिळणार, याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत. ओबीसी उमेदवार देण्याच्या शक्यतेमुळेच नाव जाहीर करण्यास विलंब होत असल्याचा दावाही केला जात आहे.