पुणे : ‘ज्या संघटनेची कोठेही नोंद नाही अशा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी झाली. त्याचवेळी महात्मा गांधी यांची १९२५ मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यालाही शंभर वर्षे पूर्ण झाली. अध्यक्षपदाच्या काळात महात्मा गांधी यांनी अस्पृश्यता निवारण मोहीम राबविली होती. ही शताब्दी काँग्रेसने साजरी करायला हवी होती,’ असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. जयदेव डोळे यांनी मंगळवारी व्यक्त केले. ‘पण, हर्षवर्धन सपकाळ नावाचे काँग्रेसचे अध्यक्ष कोणालाच माहीत नसल्याने ही शताब्दी साजरी करण्याचे त्यांच्या ध्यानात येणे अवघडच आहे,’ अशी टिप्पणीही डोळे यांनी केली.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या वतीने ‘सत्याग्रही विचारधारा’ दिवाळी अंकाचे प्रकाशन जयदेव डोळे आणि ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी डोळे बोलत होते. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष आणि अंकाचे संपादक डाॅ. कुमार सप्तर्षी, निधीचे विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख, अन्वर राजन, अभय छाजेड आणि ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी या वेळी उपस्थित होते.
‘सध्या सत्याग्रही विरुद्ध सनातनी विचारधारा असा संघर्ष दिसत आहे. सत्याग्रही विचारधारेला सत्योत्तर सत्याचा शह बसला आहे. सत्ताधाऱ्यांकडून अपप्रचार, अफवा सुरूच असून देशातील भ्रष्टाचार, काळाबाजार, गुन्हेगारी वाढली आहे. प्रसिद्धीपासून दूर असलेल्या संघटनेतून घडलेले कार्यकर्ते आता प्रसिद्धीलोलुप झाले आहेत. कुठे गेले नीतिमान स्वयंसेवक?,’ असा सवाल जयदेव डोळे यांनी उपस्थित केला.
‘दुष्ट, लबाड, घातक आणि फसवणारी व्यवस्था सत्तेवर आहे याची सध्याच्या युवकांना जाणीव आहे. त्यांना सत्याची भूक आणि गरज आहेच. त्यामुळे हताश व्हायला नको, खचून जायला नको. ‘सत्याग्रही विचारधारा’ला बळ देऊयात,’ असा आशावाद डोळे यांनी जागविला.
बागाईतकर म्हणाले, ‘हिंसेला मानणारा विचार प्रबळ होत असून त्याला सत्तेचे पाठबळ मिळत आहे. महात्मा गांधी यांची विचारधारा सांगण्यासाठी ‘सत्याग्रही विचारधारा’ कार्यरत आहे. विविधतेने भरलेल्या देशात कडवेपणा चालणार नाही. तर, उदारमतवादी आणि मध्यम मार्गाने जावे लागेल. एकव्यक्ती केंद्रित राज्यव्यवस्था प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्या दिशेने सत्ताधारी मंडळी कार्यरत आहेत.’
महात्मा गांधी, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यलढा आणि राज्यघटना यांना एकमेकांपासून वेगळे करता येत नाही. समता, बंधुता आणि अहिंसेच्या विचारांनी हा देश बांधता येईल. – डाॅ. कुमार सप्तर्षी, अध्यक्ष, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी.