पुणे : ‘भारतातील बहुसांस्कृतिकता आणि बहुभाषकता ही देशाची खरी ताकद आहे. सध्या मात्र ‘एक राष्ट्र, एक निवडणूक, एक पक्ष, एक भाषा’ याचीच चर्चा सुरू आहे. हा विचार देशाच्या खऱ्या सामर्थ्याकडे दुर्लक्ष करणारा आहे,’ अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, खासदार डॉ. शशी थरूर यांनी केली.

सिम्बायोसिस विद्यापीठाच्या वतीने ‘शब्दांची किमया, कल्पना आणि प्रेरणा’ या संकल्पनेवर आयोजित ‘साहित्य महोत्सवा’च्या उद्घाटन कार्यक्रमात डॉ. थरूर बोलत होते. माजी राजदूत पवन वर्मा, विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण, डॉ. श्वेता देशपांडे, अनिता अग्रवाल या वेळी उपस्थित होते. या वेळी डॉ. विद्या येरवडेकरलिखित ‘२०० मोटिव्हेशनल माइंड्ज’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

डॉ. थरूर म्हणाले, ‘भारतीय तत्त्वज्ञानाने अंतिम सत्य स्वत:मध्ये शोधण्याचा मार्ग दाखवला आहे. स्वर्गाची संकल्पना मृत्यूनंतरच्या जीवनात सापडत नाही. ती आताच्या जीवनात पाहावी लागते. खरा स्वर्ग हा समाजातील सलोख्यात असतो. समाजातील सलोख्यासाठी विविधता गरजेची असते. आज ज्या गोष्टी घडवल्या आणि सांगितल्या जातील, त्यानेच उद्याच्या भारताला आकार मिळणार आहे.’

‘सध्या अल्गोरिदम आणि विश्लेषणाचा काळ आहे. या युगात केवळ डेटाच आपल्याला मार्गदर्शन करू शकतो. डेटावर विश्वास ठेवणे सोपे असते. मात्र, तथ्ये सांगण्यासाठी संदर्भांची गरज असते. त्यासाठी सत्य सांगावे लागते. ते सांगण्यासाठी आपण इंग्रजीबरोबर मातृभाषेतून शिक्षण, ग्रंथालये, भाषांतरासारख्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे,’ असेही डॉ. थरूर यांनी नमूद केले.

ते म्हणाले, ‘मुलांना केवळ ‘कोडिंग’ शिकवू नये. त्यांना सर्जनशीलतेचे धडे द्यावेत. कथाकथन ही चैनीची गोष्ट नसते. समाजाच्या जडणघडणीसाठी ती अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. जागतिक कल्पनांना साहित्य प्रोत्साहन देते. त्यातून समाज भावनेला आकार देणाऱ्या विविध प्रतिमांचा, प्रतिकांचा आणि कथांचा जन्म होतो. त्यामुळे मुलांमध्ये साहित्याची आवड निर्माण करणे गरजेचे आहे.’