पुणे: महाविकास आघाडीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे लोकसभा मतदारसंघावर दावा केला असला तरी कोणत्याही परिस्थितीत लोकसभेची पुण्याची जागा काँग्रेसनेचे लढविण्याची भूमिका स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसची ताकद कशी आहे, हे मुंबई येथे शनिवारी (३ जून) होणाऱ्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार
हेही वाचा >>> पुणे: शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीत पक्षांतर्गत लढाई…उमेदवारीसाठी ‘या’ नावांची चर्चा
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जेमतेम वर्षभराचा कालावधी आहे. मात्र निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांकडून सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनंतर काँग्रेसकडूनही मतदारसंघनिहाय आढावा बैठक सुरू झाली आहे. त्याअंतर्गत पुणे लोकसभेचा आढावा मुंबई येथे शनिवारी सकाळी घेतला जाणार आहे. त्याबैठकीत कोणत्याही परिस्थितीत पुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला न देण्याची भूमिका काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून मांडण्यात येणार आहे. पक्षाचे शहराध्यक्ष, प्रदेश पातळीवरील पदाधिकारी, विविध सेलचे अध्यक्ष आणि इच्छुक उमेदवार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपानुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडे जिल्ह्यातील चार पैकी तीन लोकसभा मतदारसंघ आहेत. पुणे हा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ राहिला आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे ३९ नगरसेवक असल्याचा दावा होत असला तरी त्यात तथ्य नाही. हडपसर विधानसभा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघात तर खडकवासला विधानसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदार संघात येतो. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आहेत. वडगांवशेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाचा विचार करता कसबा, पर्वती, शिवाजीगनर, कोथरूड, वडगांवशेरी आणि पुणे कॅन्टोन्मेंट हे विधानसभा मतदारसंघ येतात. या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रसचे १० ते १२ नगरसेवक आहेत. तर काँग्रेसचे दहा नगरसेवक आहेत.
हेही वाचा >>> पुणे: माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, ‘आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळतील ‘एवढ्या’ जागा
वडगांवशेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा तर कसब्यात काँग्रेसचा आमदार आहे. यापैकी पुणे कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर मतदारसंघात गेल्या निवडणुकीत काँग्रेसला काही मतांनी पराभूत व्हावे लागले होते. या मतदारसंघात काँग्रेस दुसऱ्या क्रमंकाच पक्ष होता. तर गेल्या विधानसभा निवडणुकीत वडगांवशेरीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला काँग्रेसने पाठिंबा दिला होता. त्यामुळे काँग्रेसचीच ताकद जास्त आहे, अशी राजकीय गणिते या बैठकीत मांडण्यात येणार आहेत. दरम्यान, पुणे लोकसभेवर काँग्रेसचा दावा आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला कोणत्याही परिस्थिती दिली जाणार नाही, असे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मोठी आहे. पक्षाचे नेते अजित पवार यांनी त्याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे पुणे लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा कायम आहे. जागेबाबतचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतली. – प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.