पुणे : कात्रज घाटात रंगकाम करणाऱ्या ठेकेदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. ठेकेदाराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन एका बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
चंदर पिराजी माेहिते (वय ५६, रा. विनय सागर आर्केड, त्रिमूर्ती चौकाजवळ, भारती विद्यापीठ परिसर) असे आत्महत्या केलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. याबाबत मोहिते यांची पत्नी शकुंतला (वय ५६) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बांधकाम व्यावसायिकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदर मोहिते हे गृहप्रकल्पातील रंगकामाचा ठेका घेतात. आरोपी बांधकाम व्यावसायिक हे मोहिते यांच्या ओळखीचे होते. त्यांनी मोहिते यांना त्यांच्या तीन गृहप्रकल्पात रंगकाम करण्याचे काम दिले हाेते. या कामाच्या बदल्यात माेहिते यांना एक सदनिका आणि साडेदहा लाख रुपये देण्याचे मान्य केले होते. मोहिते यांनी परिचितांकडून हातऊसने पैसे घेऊन तीन गृहप्रकल्पाचे रंगकाम पूर्ण केले होते. व्यवहारात ठरल्यानुसार मोहिते यांनी रंगकामाचे पैसे मागितले. तेव्हा बांधकाम व्यावसायिकाने माेहिते यांना जातीवाचक शिवीगाळ केली. शिवीगाळ,तसेच फसवणूक केल्याने मोहिते यांनी ९ ऑगस्ट रोजी मध्यरात्री कात्रज घाटातील अन्विषा लाॅजमागील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली, असे मोहिते यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक आवारे तपास करत आहेत.
कात्रजमध्ये आत्महत्येची दुसरी घटना
कात्रज परिसरातील आंबेगाव बुद्रुक भागात राखी पौर्णिमेला भावाला बोलाविल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याने उच्चशिक्षित विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. तरुणीचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून भारती विद्यापीठ पोलिसांकडून पतीसह सासरकडील नातेवाइकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
स्नेहा विशाल झेंडगे (वय २७, रा. आंबेगाव बुद्रूक, कात्रज) असे आत्महत्या केलेल्या विवाहित तरुणीचे नाव आहे. याबाबत स्नेहा यांच्या वडिलांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी स्नेहा यांचे पती, सासरे, सासू, दीर, नणंदेसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर रंगकाम करणाऱ्या ठेकेदाराने आत्महत्या केल्याची घटना घडली. यापूर्वी कात्रज घाटातील दाट झाडीत आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.