पुणे : महापालिकेतील महिला अधिकाऱ्याला त्रास दिल्याप्रकरणी भाजपच्या कामगार आघाडीचे शहराध्यक्ष ओंकार कदम आणि अक्षय कांबळे यांना महापालिकेचे मुख्यालय आणि महापालिकेच्या अन्य कार्यालयांमध्ये प्रवेशबंदी करण्याचा आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला.कदम आणि अक्षय कांबळे त्रास देत असल्याची तक्रार संबंधित महिला अधिकाऱ्याने राज्य महिला आयोगाकडे दिली आहे. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेतील महिला अधिकाऱ्याची पूर्वपरवानगी न घेता व्हिडिओ चित्रीकरण करणे, दमदाटी करणे, अर्वाच्च्य भाषा वापरणे, दालनाबाहेर जाण्यास मज्जाव करून त्यांच्या कक्षात गोंधळ घालून मानसिक त्रास दिल्याची तक्रार आहे.
‘ही घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची असून, अंतर्गत तक्रार समितीकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली. अशा प्रवृत्तीच्या लोकांमुळे प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांचा वेळ वाया जाऊन नागरिकांना नागरी सेवा देण्यात अडचणी निर्माण होत आहेत. या बाबींचे गांभीर्य आणि तथ्य लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून महापालिका मुख्यालय, तसेच पालिकेच्या अन्य कार्यालयांमध्ये पुढील आदेश होईपर्यंत ओंकार कदम आणि अक्षय कांबळे यांच्यासह घटनेत सहभागी अज्ञात व्यक्तींना प्रवेश बंदी करण्यात येत आहे,’ असे आयुक्तांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.
‘कोणत्याही कारणास्तव कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास, संबंधित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्वरित प्रतिबंध करून स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून कायदेशीर कारवाई करावी,’ असेही आदेशात स्पष्ट केले आहे.