पुणे : हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये करोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. करोनाचा नवीन उपप्रकार ओमिक्रॉन जेएन.१ मुळे ही वाढ सुरू आहे. त्यातच आता महाराष्ट्रातही करोना रुग्णसंख्येत वाढ सुरू झाली आहे. राज्यात या वर्षभरात करोनाचे १०६ रुग्ण आढळून आले असून, त्यांपैकी १०१ मुंबईतील आहेत.
राज्यात जानेवारी ते २० मेपर्यंत करोनाच्या ६ हजार ६६ संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात १०६ रुग्णांना करोनाचे निदान झाले. त्यात मुंबई महापालिका हद्दीत सर्वाधिक १०१ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील ३६ रुग्ण बरे झाले आहेत. याचबरोबर ५६ रुग्णांना सौम्य आजार असल्याने त्यांच्यावर घरी उपचार सुरू आहेत, तर १६ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्यात मंगळवारी करोनाचे १९ रुग्ण आढळले. त्यात सर्वाधिक १५ रुग्ण मुंबईतील असून, कोल्हापूरमधील ३ आणि पुण्यातील १ रुग्ण आहे, अशी माहिती आरोग्य सहसंचालिका डॉ. बबिता कमलापूरकर यांनी दिली.
राज्यात करोनासह श्वसनविकाराच्या रुग्णांचे सर्वेक्षण सुरू आहे. अशा सर्वेक्षणामध्ये आढळलेल्या संशयित रुग्णांची करोना चाचणी केली जात आहे. राज्यात करोनाचे रुग्ण सध्या तुरळक आढळून येत आहेत. त्यांच्यात सौम्य लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे डॉ. कमलापूरकर यांनी स्पष्ट केले.
राज्यात दोन मृत्यू
राज्यात जानेवारीपासून आतापर्यंत करोनामुळे २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील एका रुग्णास नेफ्रोटिक सिंड्रोम हा मूत्रपिंड विकारासह हायपोकॅल्सिमिक सीझर हा चेताविकार होता, तर दुसऱ्या रुग्णास कर्करोग होता. हे दोन्ही रुग्ण सहव्याधीग्रस्त होते.
करोना रुग्णांच्या संख्येतील वाढ ही केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर इतर राज्यांतही दिसून येत आहे. काही देशांमध्येही रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. करोना विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत करण्यात येत आहे. – डॉ. बबिता कमलापूरकर, सहसंचालिका, आरोग्य विभाग