राज्यात करोना पुन्हा एकदा बळावू लागला आहे. दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत मोठी भर पडत चालली असून, करोनाचं संकट महाराष्ट्रासमोर उभं ठाकलं आहे. करोना प्रसाराच्या भीतीमुळे सरकारने सार्वजनिक कार्यक्रमासह लग्न सोहळ्यांसाठी नियमावली ठरवून दिली आहे. मात्र, माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या लग्नात करोना नियमावली पायदळी तुडवण्यात आल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणाची सगळीकडे चर्चा सुरू झाल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे. माजी खासदार महाडिक यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात करोना बाधित रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असताना. राज्य सरकारकडून कठोर पावलं उचलण्यात येत आहेत. मात्र, त्याच दरम्यान काल (२१ फेब्रवारी) पुण्यात कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाचा विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या सोहोळ्यात करोनाच्या नियमांचे पालन करण्यात आले नाही. तसेच हजारांहून अधिक नागरिक विवाह समारंभात सहभागी झाले होते. या सोहोळ्यात अनेक नेत्यांनीही हजेरी लावली होती. मात्र, समारंभादरम्यान सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करण्यात आले नाही. याप्रकरणी माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी ही माहिती दिली. माजी खासदार धनंजय महाडिक, लक्ष्मी लॉन्सचे मालक विवेक मगर आणि मॅनेजर निरुपल केदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शरद पवारांसह दिग्गजांची हजेरी

कोल्हापूर येथील माजी खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव पृथ्वीराज आणि वैष्णवी यांचा विवाह सोहळा हडपसर येथील लक्ष्मी लॉन्स येथे पार पडला. या सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार धैर्यशील माने, खासदार वंदना चव्हाण यांच्यासह उद्योगपती, क्रीडा क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विवाह सोहळ्यास हजेरी लावली होती.

फोटो- व्हिडीओ झाले होते व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या विवाह सोहळ्यामध्ये शासनाने घालून दिलेल्या कोणत्याही नियमांचे पालन केल्याचे दिसून आले नाही. तर २०० हून अधिक नागरिक सहभागी झाले होते. त्याचबरोबर बहुतांश नागरिकांनी मास्क देखील घातले नव्हते. तसेच सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहण्यास मिळाले. लग्न सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसेच पोलीस कारवाई करणार का? असा सवालही उपस्थित केला जात होता. मात्र अखेर आज हडपसर पोलिसांनी धनंजय महाडिक यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.