पुणे : मतिमंद मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या ज्येष्ठाविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत पीडित मुलीच्या आईने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका ७० वर्षीय ज्येष्ठाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी दहा वर्षांची असून, ती मतिमंद आहे. आरोपी ज्येष्ठाला मुलीचे कुटुंबीय ओळखतात. तो घराशेजारी राहायला आहे. ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणेआठच्या सुमारास मतिमंद मुलगी घरासमोर खेळत होती. त्यावेळी आरोपीने मुलीला आमिष दाखवून घराशेजारी असलेल्या अडगळीच्या जागेत नेले. तेथे त्याने मुलीशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर मुलगी घाबरली. तिने या घटनेची महिती कुटुंबीयांना दिली.
त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी ज्येष्ठाविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मदने तपास करत आहेत.
शाळकरी मुलीचा विनयभंग करणारे अटकेत
शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांना उत्तमनगर पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी समीर मौलाना सय्यद (वय ३९), आकाश अभिमान ओहोळ (वय ३२), जितेंद्र संपत माळी (वय ४५, रा. किरकिटवाडी, सिंहगड रस्ता) यांना अटक करण्यात आली. याबाबत शाळकरी मुलीने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुलगी ५ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास उत्तमनगर परिसरातून शिकवणीला निघाली होती. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी मुलीला अश्लील इशारे केले. तिघांनी मुलीची मोबाइल क्रमांक मागितला, असे मुलीने फिर्यादीत म्हटले आहे. पसार झालेल्या तिघांना अटक करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक धनवडे तपास करत आहेत.
युवतीवर बलात्कार प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा
अल्पवयीन युवतीला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत युवतीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, एक युवकासह त्याची आई आणि भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी ठाणे जिल्ह्यातील कल्याण परिसरात राहायला आहेत. आरोपी युवकाची आणि युवतीची ओळख झाली होती. आरोपी युवकाने तक्रारदार युवतीला आरोपीने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याने विवाहाच्या आमिषाने युवतीवर वेळोवेळी बलात्कार केला. युवती गर्भवती झाली. युवतीने विवाहाबाबत विचारणा केल्यानंतर आरोपीने टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.
