लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : ‘निर्भय बनो’ सभेच्या ठिकाणी येऊन गोंधळ घातल्याप्रकरणी पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. सभेचे आयोजक, भाजप आणि महाविकास आघाडीच्या २०० ते २५० कार्यकत्यांविरुद्ध जमावबंदीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी, तर मोटारीची तोडफोड आणि शाईफेक केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेवकासह १० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
राष्ट्र सेवा दलाच्या वतीने साने गुरुजी स्मारक येथे आयोजित निर्भय सभेत भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. याप्रकरणी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजय मोरे यांच्यासह २०० ते २५० कार्यकर्त्यांविरुद्ध जमावबंदीचा आदेश भंग केल्याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई अनिरुद्ध आनेराव यांनी याबाबत पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या सभेला परवानगी नाकारण्यात आली असतानाही सभा घेतल्याने आयोजकांवरही जमावबंदीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा >>>“व्यसन असल्यासारखं मी…”, जुन्या आठवणीत रमले राज ठाकरे; हात फ्रॅक्चर झाल्याने सोडावा लागला होता ‘हा’ खेळ!
सामाजिक कार्यकर्ते अॅड. असीम सरोदे, विश्वंभर चौधरी आणि ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे हे सभेच्या ठिकाणी चालले असताना खंडुजीबाबा चौकात मोटार अडवून तोडफोड आणि शाईफेक करण्यात आली. या प्रकरणात माजी नगरसेवक दीपक पोटे, गणेश घोष, स्वप्नील नाईक, बापू मानकर, दुष्यंत मोहोळ, गिरीश मानकर, राहुल पायगुडे, गणेश शेरला, प्रतीक देसरडा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत श्रद्धा वसंत जाधव (वय २१, रा. मुंढवा) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वागळे यांच्यावरील हल्ल्याचा विविध स्तरांतून निषेध
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या मोटारगाडीवर केलेल्या हल्ल्याचा विविध स्तरांतून निषेध करण्यात येत आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाने एक पत्रक प्रसिद्ध करून वागळे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. हल्लेखोरांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या सहाय्याने शोधून काढावे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. पत्रकारांवर हल्ले करून त्यांना दाबण्याचा मूर्खपणा कुणीही करू नये. त्यामुळे खोटे लपणार नाही. सत्य हे केव्हा तरी बाहेर येणारच आहे. याचे भान ठेवावे, असे जर्नालिस्ट् युनियन ऑफ महाराष्ट्रने म्हटले आहे. तुम्ही धमक्या दिल्या, रस्ता अडवला, गाडय़ा फोडल्या तरी सुध्दा सभा झालीच. या भ्याड हल्याचा निषेध करत असल्याचे छात्रभारती विद्यार्थी संघटनेने सांगितले. मराठी कलाविश्वातील वीणा जामकर, किरण माने यांनीही निषेध व्यक्त केला.
या प्रकरणात पर्वती पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जमावबंदी आदेशाचा भंग आणि मोटारीचे नुकसान केल्या प्रकरणी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. सभेचे आयोजक, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, ठाकरे गट, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. – प्रवीणकुमार पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त