पिंपरी : राजीव गांधी आयटी पार्कमध्ये नैसर्गिक ओढे, नाल्यांवर अतिक्रमण करून पूरपरिस्थितीला कारणीभूत ठरणारे आठ जागा मालक आणि व्यावसायिकांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) कर्मचारी हरीश अंगद माने यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जागामालक आणि व्यावसायिक अशा आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी, माण आणि मारुंजी भागातील नैसर्गिक ओढे, नाल्यांभोवती पाण्याचा प्रवाह अडवून, दिशा बदलून अनधिकृत बांधकामे झाली आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी हिंजवडीत पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. रस्ते जलमय झाले होते. त्यामुळे लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. या अनुषंगाने हिंजवडीत नाले आणि नाल्याच्या पात्रांत अनधिकृत बांधकाम करणारे जागा मालक, व्यावसायिक यांच्या विरोधात पर्यावरण संरक्षण, जल प्रदूषण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
अनधिकृत बांधकामांवर कारवाई
मारुंजी भागातील अनधिकृत बांधकाम आणि इमारतींवर ‘पीएमआरडीए’च्या अनधिकृत बांधकाम व निर्मूलन विभागाकडून कारवाई सुरू आहे. तीन अनधिकृत इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. पाच मजली इमारत पाडण्याचे काम सुरू आहे. मात्र, न्यायालयाच्या आदेशामुळे ही कारवाई थांबविण्यात आल्याचे ‘पीएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
चार जागा मालक आणि चार व्यावसायिक अशा आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितांनी जागा व्यावसायिकांना भाडेतत्त्वावर दिल्या आहेत.- बालाजी पांढरे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हिंजवडी पोलीस ठाणे</strong>