पुणे : केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्राच्या वतीने ‘ओपन डे’चे आयोजन करण्यात आले असून, खडकवासला येथील केंद्राच्या आवारात देशातील लहान-मोठ्या धरणांचे अभ्यास नमुने, जल विद्युत प्रकल्पांचे आराखडे नागरिकांना पाहता येणार आहेत. राष्ट्रीय जल अकादमीचे मुख्य अभियंता डी. एस. चासकर यांच्या हस्ते शनिवारी (१४ जून) सकाळी दहा वाजता या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे केंद्राचे संचालक डॉ. प्रभात चंद्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
‘पुण्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठी ही पर्वणी असून, त्यांना केंद्राच्या संशोधन सुविधा, मुंबई बंदर, वेव्ह फ्ल्यूम, यमुना नदी, रतले, पोलावरम, मंगदेछु जल विद्युत प्रकल्प, कल्पसर प्रकल्प यांचे नमुने पाहता येणार आहेत,’ असे चंद्रा यांनी स्पष्ट केले.
‘केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालय, जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाच्या अंतर्गत खडकवासला येथील जल आणि विद्युत संशोधन केंद्रात देशातील विविध धरणांचा अभ्यास करण्यात येतो. धरणांचे आराखडे, त्यांच्या संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना केंद्राच्या माध्यमातून ठरविण्यात येतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरही केंद्राच्या माध्यमातून विविध धरणांचे आराखडे तयार करण्यात आले आहेत,’ असे चंद्रा म्हणाले.