स्वयंचलित यंत्रणेतून हजारोंची तिकिटे गायब

अवैधरीत्या तिकिटे विकणाऱ्याला पकडले

तांत्रिक गडबडी करून बँका त्याचप्रमाणे ग्राहकांना गंडा घालणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी पुणे रेल्वेलाही झटका दिला आहे. पुणे स्थानकावर बसविलेल्या स्वयंचलित तिकीट यंत्रातून एका भामटय़ाने हजारो रुपयांची तिकिटे गायब करून त्याची विक्री केल्याचे उघड झाले आहे. यंत्रातून क्षमतेपेक्षा अधिक तिकिटे काढली जात असल्याने काहीतरी गडबड असल्याचे रेल्वेच्या ध्यानात आल्यानंतर हा प्रकार उघड झाला.

तिकीट यंत्रणेतील सायबर गडबडींमुळे बसणारा फटका रेल्वेला नवा नसला, तरी पुणे स्थानकावर स्वयंचलित तिकीट यंत्राबाबत पहिल्यांदाच असा प्रकार उघडकीस आला आहे. रेल्वेची ऑनलाइन तिकीट यंत्रणा ताब्यात घेण्याचे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहेत. त्याचप्रमाणे तिकिटांचे आरक्षण किंवा तत्काळ तिकिटांबाबतही सातत्याने भामटय़ांकडून घोटाळे करण्यात येतात. सायबर घोटाळे करणाऱ्यांनी आता तिकीट यंत्राकडे नजर वळविल्याचे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे.

राधेश्याम अगरवाल (रा. औरंगाबाद) असे या प्रकरणात पकडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. अगरवाल याच्याकडे स्वयंचलित तिकीट यंत्रणेतून तिकीट काढण्यासाठी त्याच्या नावाचे स्माट कार्ड होते. या कार्डाच्या साहाय्याने यंत्रावर केवळ एक हजार रुपयांपर्यंतची तिकिटे काढता येत होती. मात्र, त्याने यंत्रणेत तांत्रिक गडबड करून स्माट कार्डच्या आधारे हजारो रुपयांची तिकिटे काढल्याचे स्पष्ट झाले आहे. तिकिटे काढून तो प्रवाशांना त्याची विक्री करत होता. त्याच्याकडे अशा प्रकारची २२ स्मार्ट कार्ड व काही तिकिटेही रेल्वेला सापडली आहेत. अगरवाल याला अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. मात्र, या नव्या घोटाळ्याने रेल्वेची डोकेदुखी आणखी वाढली आहे.

असा उघड झाला घोटाळा..

पुणे रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे स्थानकावर बसविलेल्या स्वयंचलित तिकीट यंत्रामधून दिवसाला २० ते २२ हजार रुपयांची तिकिटे काढली जाऊ शकतात. मात्र, ३ जुलैला या यंत्रणामधून तब्बल १ लाख ६३ हजार रुपयांच्या तिकिटांची विक्री झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे रेल्वेला याबाबत शंका आली. वरिष्ठ वाणिज्यिक व्यवस्थापक गौरव झा, वाणिज्य व्यवस्थापक मदनलाल मीना यांनी याचा छडा लावण्यासाठी एक पथक तयार करून सापळा लावला. या सापळ्यामध्ये राधेश्याम अगरवाल सापडला. अवैधरीत्या यंत्रणातून तिकिटे काढून विक्री करताना त्याला रंगेहात पकडण्यात आले.