कोटय़वधी रुपये खर्च करून शहरात विविध ठिकाणी बांधलेले सायकल ट्रॅक निरुपयोगी ठरलेले असताना आता महापौर वैशाली बनकर यांच्या आग्रहाखातर त्यांच्या प्रभागात तब्बल सत्तर लाख रुपये खर्च करून सिंथेटिक सायकल ट्रॅक बांधण्याचा घाट महापालिकेत घालण्यात आला आहे. या विषयाचा गाजावाजा होऊ नये म्हणून स्थायी समितीत मंगळवारी हा विषय घाईघाईने आणून तितक्याच घाईने मंजूरही करण्यात आला.
महापौर वैशाली बनकर यांच्या सातववाडी प्रभागामध्ये हा सायकल ट्रॅक बांधला जाणार असून तो पुण्यातील पहिला सिंथेटिक सायकल ट्रॅक असेल, असे सांगितले जात आहे. गोंधळेनगर ते गाडीतळ दरम्यानच्या दीड किलोमीटर अंतरात हा ट्रॅक बांधला जाईल. त्यासंबंधीचा अन्य कोणताही तपशील तूर्त कोणालाही सांगता येत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळेच हा विषय मंगळवारी हातोहात मंजूर करण्यात आला. स्थायी समितीत तो घाईगर्दीने आणण्यात आला आणि लगेचच दाखलमान्य करण्यात आला. त्यामुळे त्याबाबतचा संशय अधिकच वाढला आहे.
स्वारगेट ते कात्रज आणि स्वारगेट ते हडपसर या बीआरटी मार्गावर पुण्यात कोटय़वधी रुपये खर्च करून सायकल ट्रॅक विकसित करण्यात आला आहे. याशिवाय बाजीराव रस्ता, कर्वे रस्ता, मॉडेल कॉलनी भागातून जाणारा कालव्यावरील रस्ता तसेच अन्यही अनेक ठिकाणी महापालिकेने सायकल ट्रॅक बांधले आहेत. त्यांचा वापर अतिशय मर्यादित प्रमाणात होत असून बीआरटी मार्गावरील सायकल ट्रॅकवर व्यावसायिकांनी मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमणेही केली आहेत. एकीकडे सायकल ट्रॅकवरील कोटय़वधी रुपयांचा खर्च ही उधळपट्टी ठरलेली असताना आणि ही योजना फसलेली असताना आता पुन्हा महापौरांच्या आग्रहामुळे त्यांच्या प्रभागात तब्बल सत्तर लाखांचा सायकल ट्रॅक बांधण्याचा घाट घालण्यात आला आहे.
प्रस्ताव पूर्वीच दिला होता – महापौर
महापौर वैशाली बनकर यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्या म्हणाल्या, की प्रस्ताव यापूर्वीच दिलेला होता. तो कार्यपत्रिकेवर न आणता स्थायी समितीत आयत्यावेळी का आणण्यात आला त्याची मला माहिती नाही. जेथे हा ट्रॅक बांधला जाणार आहे तेथे पाच-सहा शाळा असल्यामुळे त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना होईल.
संग्रहित लेख, दिनांक 8th May 2013 रोजी प्रकाशित
महापौरांच्या प्रभागासाठी सत्तर लाखांचा सायकल ट्रॅक
महापौर वैशाली बनकर यांच्या आग्रहाखातर त्यांच्या प्रभागात तब्बल सत्तर लाख रुपये खर्च करून सिंथेटिक सायकल ट्रॅक बांधण्याचा घाट महापालिकेत घालण्यात आला आहे.
First published on: 08-05-2013 at 02:50 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cycle track of 70 lacks for mayors ward