पुणे : मुलांनी जेवताना कार्टून, मोबाइलऐवजी बालभारतीची पुस्तके पाहिली पाहिजेत इतकी पाठ्यपुस्तके दर्जेदार असावीत, अशी अपेक्षा व्यक्त करून शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी आता शालेय शिक्षणात सोप्याकडून कठीणकडे असे सूत्र स्वीकारण्यात आल्याचे स्पष्ट केले.
महाराष्ट्र पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळातर्फे (बालभारती) आयोजित पाठ्यपुस्तक निर्मिती उद्बोधन वर्गाच्या उद्घाटनावेळी भुसे बोलत होते. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर, योजना संचालक डॉ. कृष्णकुमार पाटील, माध्यमिक संचालक डॉ. महेश पालकर, बालभारतीच्या संचालक डॉ. अनुराधा ओक, सुकाणू समिती सदस्य डॉ. श्रीपाद ढेकणे या वेळी उपस्थित होते.
भुसे म्हणाले, ‘मोबाइल, दूरचित्रवाणी, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा आव्हानांना सामोरे जाताना मातीशी नाळ तुटते आहे का, संस्कृतीपासून अंतर पडते आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. हल्लीच्या काळात मुले, पालक मोबाइलमध्ये असतात. मुलांनी जेवताना कार्टून, मोबाइलऐवजी बालभारतीची पाठ्यपुस्तके पाहिली पाहिजेत.’
‘‘राष्ट्र प्रथम’ ही संकल्पना शिक्षण विभागाने घेतली आहे. त्यानुसार शिक्षण हे भाकरीची, राष्ट्रीयत्त्व देण्याची जबाबदारी आहे. विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहून, चरितार्थाचे साधन निर्माण करून घराची चूल पेटवू शकले पाहिजेत. राष्ट्रीय विचारांचे नागरिक म्हणून घडले पाहिजेत. त्यामुळे पाठ्यपुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसह महान व्यक्तिमत्त्वे, क्रांतिकारक, समाजसुधारक, राज्यघटना, शेती, पर्यावरण, वाहतूक नियम, स्वच्छता, व्यसनमुक्त, संरक्षण, परराष्ट्र धोरण, दळणवळण, खनिज संपत्ती अशा घटकांचाही पाठ्यपुस्तकात इयत्तेनुसार समावेश असावा,’ असे ते म्हणाले.
‘राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी शिकवण्याची अंमलबजावणी, सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये राज्यगीताचे गायन याची अंमलबजावणी झाली पाहिजे,’ असे भुसे यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांवर केवळ माहितीचा मारा न करता कृतीशील, विश्लेषणात्मक संकल्पना अधिक स्पष्ट करून नव्या संकल्पना आणि तंत्रज्ञानाची जोड पाठ्यपुस्तकांत द्यावी, असे देओल यांनी सांगिले. तर, राज्याची पाठ्यपुस्तके देशात सर्वोत्कृष्ट ठरतील, असा विश्वास सचिंद्र प्रताप सिंह यांनी व्यक्त केला. रेखावार, डॉ. ओक यांनीही मनोगत व्यक्त केले.