इंदापूर : राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे निधी मिळण्यास उशीर झाला. मात्र, आता परिस्थिती पूर्ववत झाली आहे,’ असे स्पष्टीकरण राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमवारी दिले.
इंदापूर येथे अमृत महाआवास अभियानांतर्गत घरकुल लाभार्थ्यांचा मेळाव्याच्या कार्यक्रमात ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे निधी मिळण्यास विलंब झाल्याचे वक्तव्य भरणे यांनी केले होते. त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रविवारी पुण्यात विचारले असता, ‘ते माझे सहकारी आहेत आणि एका खात्याचे मंत्री आहेत. ते कोणत्या हेतूने, कोणत्या अपेक्षेने बोलले आहेत, हे त्यांना विचारतो,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर, भरणे यांनी त्यांच्या विधानाबाबत सोमवारी स्पष्टीकरण दिले.
भरणे म्हणाले, ‘या योजनेला विरोध नाही. ही योजना महायुती सरकारने आणली. ही चांगली योजना असून, यापुढेही महिलांसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नवीन योजना आणणार आहेत. या योजनेमुळे विकासकामाच्या निधीसाठी थोडाफार उशीर झाला, तरी आता परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. आता निधी उपलब्ध होत आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला.’
‘इंदापूर तालुक्यासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करीत आहे. कोठेही असलो, तरी तालुक्याकडे लक्ष असते. इंदापूरला कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू देणार नाही,’ असे भरणे म्हणाले.
विकासकामाच्या निधीसाठी थोडाफार उशीर झाला, तरी आता परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. आता निधी उपलब्ध होत आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. – दत्तात्रय भरणे, क्रीडामंत्री.