पुणे : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी ३१ जुलैची मुदत देण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्तांनी विद्यार्थी सुरक्षिततेसंदर्भात नियमावलीची शालेय व्यवस्थापन समितीकडून आणि वाहनचालकांकडून अंमलबजावणी होत आहे किंवा नाही यासाठी पुणे उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

पुणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) नुकतेच परिपत्रक काढून पोलीस आणि परिवहन विभागाकडून संयुक्त तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. शालेय शिक्षण विभागाने स्थापन केलेल्या ‘शालेय परिवहन समिती’ आणि ‘विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा समिती’चा आधार घेऊन नियंत्रण ठेवण्यासंदर्भात शाळांना सांगितले आहे.

शहरासह, उपनगरांतील शाळा १६ जूनपासून सुरू झाल्या. तत्पूर्वी शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसंदर्भात पुणे पोलिसांनी नियमावली जाहीर केली. शालेय बस, व्हॅन आणि रिक्षांमधून क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होताच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी परिवहन विभागासोबत बैठक घेतली. यावेळी ‘आरटीओ’ला नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश दिले.

नेत्रतपासणी बंधनकारक

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना दरवर्षी नेत्रतपासणी करणे बंधनकारक आहे. त्यानुसार या चालकांची नेत्रतपासणी झाली आहे किंवा नाही याचे प्रमाणपत्र सोबत बाळगावे लागणार आहे. याबाबत शालेय व्यवस्थापन समितीने याची तपासणी करून ज्या वाहनचालकांनी नेत्रतपासणी केली नसेल, अशा चालकांना वाहन चालविण्यास देऊ नये, असेही निर्देश परिवहन विभागाने दिले आहेत.

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आय़ुक्तांनी काढलेल्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन विभाग आणि वाहनचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. वाहनांमध्ये ३१ जुलैपर्यंत सीसीटीव्ही बसविण्याची मुदत देण्यात आली असून, याबरोबर सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी होत आहे किंवा नाही, याबाबत पुणे पोलीस आणि आरटीओ अशी संयुक्त तपासणी मोहीम राबविली जाणार आहे. तपासणीत दोषी आढळणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई केली जाईल. स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.

काय आहेत नियम ?

शालेय बस, व्हॅनमध्ये ३१ जुलैपर्यंत सीसीटीव्ही बसवावेत.

सहा वर्षांखालील विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी वाहनांमध्ये महिला कर्मचारी आवश्यक

रिक्षातून केवळ पाच विद्यार्थ्यांची वाहतूक करावी.

मुली असणाऱ्या शाळेतील वाहनांमध्ये महिला कर्मचारी बंधनकारक.

शालेय बस, व्हॅन चालक आणि वाहकांची पोलीस पडताळणी करावी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक होत आहे किंवा नाही यासाठी शालेय समितीने तपासणी करावी.