धुरामुळे होणारे प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशातून या वर्षी ग्रीन फायरवर्क प्रकारच्या फटाक्यांना मागणी आहे. दिवाळीबरोबरच ट्ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक लढतीचे आकर्षण असून विजयाच्या शक्यतेने फटाके खरेदीमध्ये वाढ झाली आहे. फटाक्यांच्या दरामध्ये ४० ते ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

हेही वाचा : विश्लेषण : टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान धोकादायक संघ… पण जगज्जेतेपदाची संधी किती?

प्रदूषणामुळे फटाक्यांची विक्री घटत असतानाच हा व्यवसाय टिकवण्यासाठी यंदा ‘ग्रीन फायरवर्क’चे प्रकार बाजारात दाखल झाले आहेत. ग्रीन फायरवर्कचे लेबल असलेली आणि धूर कमी करणारी फुलबाजी, ‘फॅन्सी’ फटाके, भुईनुळे, भुईचक्र या प्रकारांना ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. पर्यावरणपूरक फटाके जरी बाजारात दाखल झाले असले, तरी दरवाढीमुळे यंदा फटाक्यांची खरेदी पुणेकरांचा खिसा रिकामा करणार आहे.

हेही वाचा : ‘पीएमआरडीए’ने समाविष्ट गावांच्या विकासासाठी महापालिकेला ५०० कोटी द्यावे; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची सूचना

दोन वर्षांनंतर दिवाळी जोरदार साजरी होणार असल्याने शहरात फटाक्यांच्या स्टॉलची संख्याही यंदा वाढली आहे. सिंहगड रस्ता, कोथरूड, शनिवार पेठेतील नदीपात्रालगतचा रस्ता, गोळीबार मैदान या परिसरात फटाक्यांचे अनेक स्टॉल्स लागले आहेत. पूर्वी २५० ते ३०० रुपयांना मिळणारा सुतळी बॉम्बचा बॉक्स ४०० रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. तर फुलबाजी, भुईनुळे, भुईचक्र, बाण, लवंगी, लक्ष्मी बॉम्ब, आकाशात उंच उडणारे ‘फॅन्सी’ फटाके यांच्याही किमतीत वाढ झाली आहे. या फटाक्यांमध्ये पर्यावरणपूरक फटाक्यांना अधिक मागणी आहे. दोन वर्षांपूर्वी बाजारात दाखल झालेल्या या फटाक्यांच्या प्रकारांचे उत्पादन यंदा ८० ते ९० टक्क्यांनी वाढले असून, नागरिकांकडूनही या फटाक्यांची मागणी केली जात आहे. सुट्या लवंगींची विक्रीही चांगली होत असल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा : पुण्यातील कोंढव्यात अमली पदार्थ तस्कराकडून दहा लाखांचे मेफेड्रोन जप्त

फटाक्यांच्या किमती कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात वाढवल्या आहेत. दोन वर्षानंतर फटाक्यांच्या बाजाराने पुन्हा एकदा जोर धरला आहे. मुलांचा हट्ट पुरविण्यासाठी पालक फटाके खरेदीला प्रतिसाद देत आहेत. – दिनेश सप्तर्षी, फटाका व्यावसायिक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रदूषणमुक्त फटाक्यांना यंदा मोठी मागणी आहे. ‘ग्रीन फायरवर्क’चा शिक्का असलेले अनेक फटाके बाजारात दाखल झाले असून नागरिकांकडून त्यांची विचारणा होत आहे. यंदा या फटाक्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होईल. – अभिजित गोरिवले, फटाके विक्रेते