सत्यजीत तांबे यांनी युवा नेता आणि व्यक्ती म्हणून चांगले काम केले आहे. मात्र राजकीय निर्णय धोरणांप्रमाणे करावे लागतात. नाशिक पदवीधर निवडणुकीबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली.नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुधीर तांबे यांच्याऐवजी त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तांबे यांना पाठिंबा देऊन भारतीय जनता पक्षाने काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना धक्का दिल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजीत तांबे यांचे कौतुक करतानाच योग्य वेळी निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले.
हेही वाचा >>> नाशिक: फसवणुकीत एक लाखापेक्षा अधिक रुपयांचा मुद्देमाल लंपास
युवा नेता म्हणून सत्यजीत तांबे यांचे काम निश्चितच चांगले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काय धोरण आहे, हे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले आहे. या जागेसाठी भाजप उमेदवार देणार होता. पक्षाकडून राजेंद्र विखेंना उमेदवारी देण्याचे विचाराधीन होते. त्यासंदर्भात विखे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर चर्चा सुरू होती. मात्र काही कारणांमुळे राजेंद्र यांनी उमेदवारी स्वीकारण्यास असमर्थता दर्शविली, असे फडणवीस यांनी सांगितले.
हेही वाचा >>> तुम्ही भाजपा पुरस्कृत उमेदवार होणार का? सत्यजीत तांबे म्हणाले, “एका उदात्त हेतूने…”
सत्याजीत तांबे यांच्या पुस्तक प्रकाशनाला फडणवीस उपस्थित होते. त्यामुळे नाशिकमध्ये सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरणे आणि भाजपने उमेदवार न देणे हे फडणवीसांचेच धक्कातंत्र असल्याचे बोलले जात आहे. इतकेच नव्हे तर तांबे हेच भाजपचे उमेदवार असल्याची चर्चा आहे. मात्र राजकीय क्षेत्रात एकमेकांच्या कार्यक्रमाला जाणे हे काही नवीन नाही. आजचा जो काही घटनाक्रम तुम्हाला वाटतो तसा नाही. योग्यवेळी तो तुमच्यासमोर येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.पंकजा मुंडे नाराज असून त्या शिवसेने प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र पंकजा मुंडे भाजप सोडणार नाहीत. भाजप हेच त्यांचे घर आहे, असे उत्तर फडणवीस यांनी दिले.