पुणे : धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली. उभयतांमध्ये चर्चा झाली. त्यानुसार धैर्यशील हे दोन दिवसांत राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. मात्र, भेटीनंतर दोघांनीही उमेदवारीबाबत कोणतेही भाष्य केले नाही. त्यामुळे माढ्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवार अद्यापही गुलदस्त्यातच आहे.

माढा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहिते पाटील आणि रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोध दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर धैर्यशील हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षात पक्षात प्रवेश करून उमेदवारी घेण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी गुरुवारी शरद पवार यांची पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली. सांगोल्याचे शेकापचे नेते बाबासाहेब देशमुख, संभाजी ब्रिगेडचे प्रविण गायकवाड या वेळी उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ‘ही केवळ सदिच्छा भेट होती. मोहिते पाटील घराण्याशी शरद पवार यांचे जुने संबंध आहेत.’ एवढीच प्रतिक्रिया धैर्यशील यांनी दिली. त्यानंतर ‘थांबा आणि वाट पहा’ एवढेच सूचक वाक्य बोलून ते निघून गेले.

हेही वाचा…पिंपरी : मोशीत जलवाहिनीला गळती, हजारो लीटर पाणी वाया

दरम्यान, ‘धैर्यशील यांचा रविवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश होणार आहे. उमेदवारीची मागणी किंवा अपेक्षा धरून कार्यकर्ते भेटायला येत नसतात. त्यांचे जनमानसातील स्थान लक्षात घेऊन पक्ष निर्णय घेत असतो. विजयसिंह मोहिते पाटील हे आजारी असल्याने त्यांना मर्यादा आहेत. मात्र, त्यांच्याशी चर्चा करून आणि सहमतीनेच मोहिते यांच्या घरात निर्णय होत असतात,’ असे त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी सांगितले. मात्र, धैर्यशील यांच्या उमेदवारीवर अधिक भाष्य करणे टाळले.

हेही वाचा…चुकीच्या शेती विषयक धोरणांच्या विरोधात आसूड उगारण्याची वेळ आली – खासदार डॉ. अमोल कोल्हे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेतकरी मेळावा घेऊन शक्तीप्रदर्शन करून अर्ज दाखल करतील

धैर्यशील यांच्यासोबत त्यांचे काही कार्यकर्ते होते. धैर्यशील यांचा दोन दिवसांनी वाढदिवस आहे, त्यादिवशी अकलुज, माळशिरस परिसरात मोठा शेतकरी मेळावा घेऊन शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. या मेळाव्याला शरद पवार यांनी यावे, अशी विनंती धैर्यशील यांनी या वेळी केली. त्यानंतर १६ एप्रिल रोजी ते माढ्यातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरतील, असे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.