संबंधित विद्यार्थी तांत्रिकदृष्टय़ा नववी आणि अकरावीतच

पुणे :  राज्य मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीचे परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असताना नववी आणि अकरावीतून ‘वर्गोन्नत’ झालेल्या विद्यार्थ्यांचा नवाच प्रश्न समोर आला आहे. ऑनलाइन प्रणालीवर गुण भरल्याशिवाय ‘वर्गोन्नत’ म्हणून नोंद होत नसल्याने संबंधित विद्यार्थी तांत्रिकदृष्टय़ा नववी आणि अकरावीतच असून, या विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा अर्ज भरण्यात अडचणी येऊ शकतात.

राज्य मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने सरल प्रणालीतील माहितीद्वारे भरले जातात. करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षी शासन निर्णयानुसार नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करून निकाल जाहीर करण्यात आला. मात्र शाळेतच न आलेल्या, मूल्यमापनासाठी उपलब्धच न झालेल्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याबाबत शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित विद्यार्थी दहावी आणि बारावीच्या वर्गात वर्गोन्नत झाले. मात्र या विद्यार्थ्यांचे स्टुडंट पोर्टलवर गुण भरल्याशिवाय वर्गोन्नत म्हणून नोंद होत नाही. या संदर्भात मुख्याध्यापक महामंडळाने शासनाकडे लेखी निवदेन दिले आहे. मात्र शासनाकडून त्याबाबत मार्गदर्शन देण्यात आलेले नाही.

वर्गोन्नतीची नोंद झालेली नसल्याने संबंधित विद्यार्थी तांत्रिकदृष्टय़ा नववी आणि अकरावीतच आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीचा परीक्षा अर्ज भरण्यात अडचणी निर्माण होणार आहेत, असे मुख्याध्यापक महामंडळाचे प्रवक्ता महेंद्र गणपुले यांनी सांगितले.

वर्गोन्नत म्हणून नोंद न झालेल्या विद्यार्थ्यांबाबत माध्यमिक शिक्षण संचालकांशी चर्चा केली आहे. या विद्यार्थाच्या तांत्रिक अडचणी सोडवण्यात येतील. या विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावी परीक्षेचा अर्ज भरण्यात अडचणी येणार नाहीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य मंडळ