सावंतवाडी:कणकवली येथील दिक्षा चव्हाण हिने महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या ५९ व्या कुमार गट राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई करून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे. या कामगिरीमुळे तिची ५० व्या सब जुनियर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. दि. १४- १५ ऑक्टोबर रोजी एम सी ए ट्रेनिंग सेंटर, दादर येथे ही राज्यस्तरीय स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत राज्यभरातून १६० हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते, ज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२ खेळाडूंचा समावेश होता.

​कनेडी, कणकवली येथील दिक्षा चव्हाण हिने २१ वर्षांखालील मुलींच्या गटात उत्कृष्ट खेळ दाखवत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात तिचा सामना रत्नागिरीच्या आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या आकांक्षा कदम हिच्याशी झाला. अत्यंत चुरशीच्या आणि तीन सेटपर्यंत रंगलेल्या या लढतीत दिक्षाला १५ – १६, १८ – ०५, ०४ – २१ अशा निसटत्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. अनुभवी आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आकांक्षा कदम आपल्या अनुभवाच्या जोरावर दिक्षावर वरचढ ठरली.

​स्पर्धेतील विजेत्यांना राज्य कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, मानद सचिव अरुण केदार, सह सचिव केतन चिखले, तसेच मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे कार्याध्यक्ष धनंजय पवार व खजिनदार संजय देसाई यांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.

​या उल्लेखनीय कामगिरीमुळे सिंधुदुर्गच्या दिक्षा चव्हाणची १ नोव्हेंबर २०२५ पासून ग्वोलीयर, मध्यप्रदेश येथे होणाऱ्या ५० व्या सब जुनियर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशन आणि सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम परिवारातर्फे तिचे अभिनंदन करण्यात आले असून, राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.