पिंपरी : पिंपरी पालिकेच्या पहिल्याच ऑनलाईन सभेचा बोजवारा उडाल्याचे गुरुवारी दिसून आले. अनेक नगरसदस्य आणि अधिकाऱ्यांना विविध प्रकारच्या तांत्रिक अडचणींमुळे सभेत सहभागी होता आले नाही. सहभागी झालेल्यांना अनेक बिघाड जाणवत होते. ही सभा विचित्र होती, असे सांगून सभेत सदस्यांना बोलताच येत नसल्याचे कारण देत राष्ट्रवादी काँग्रेसने ऑनलाईन सभा घेण्यास विरोध दर्शवला आहे.

राज्य शासनाच्या आदेशानुसार सभेचे कामकाज ऑनलाईन घेण्यात आले. महापौर माई ढोरे यांनी त्यांच्या कार्यालयातून सभेचे संचालन केले. प्रभारी नगरसचिव चंद्रकांत इंदलकर उपस्थित होते. पालिकेचे पदाधिकारी त्यांच्या कक्षातून, सदस्य आपापल्या घरातून तथा कार्यालयातून आणि अधिकारी कामाच्या ठिकाणावरून सभेत सहभागी झाले. तासभर चाललेल्या सभेत देहूतील कन्या विद्यालयाला १५ लाख अनुदान देण्याचा विषय दफ्तरी दाखल करण्यात आला. याव्यतिरिक्त सर्व विषय मंजूर करण्यात आले. निवृत्तीच्या मार्गावर असलेले समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले यांची रखडलेली पदोन्नती जाता-जाता मंजूर करावी, अशी आग्रही मागणी अनेकांनी केली.

ऑनलाईन सभेचा प्रयोग फसल्याची भावना सभा संपल्यानंतर अनेकांनी व्यक्त केली. कामकाज कशापद्धतीने होणार, याविषयी अनेकांना पुरेशी माहितीच नव्हती. तांत्रिक कारणास्तव अनेक अधिकारी व नगरसेवकांना सभेत सहभागी होता आले नाही. आवाज व्यवस्थित ऐकू येत नसल्याच्या तक्रारी होत्या. एकाच वेळी अनेक जण बोलत होते. सभेत कोण काय बोलतो आहे, याचा अंदाज येत नव्हता. घाई करत तासाभरात कामकाज उरकण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, राष्ट्रवादीचे गटनेते राजू मिसाळ, माजी महापौर मंगला कदम यांनी ऑनलाईन सभेस विरोध केला आहे.

ऑनलाईन सभा विचित्र झाली. अशाप्रकारे सभा घ्यायलाच नको होती. व्यवस्थित आवाज येत नव्हते. अनेकदा दुहेरी आवाज जाणवत होता. ऑनलाईन सभेत सर्वानाच महत्त्वाच्या विषयावर मत मांडता येत नाही. ऑनलाईन सभेऐवजी यापुढे पालिका पदाधिकारी व सर्व पक्षातील मोजके ज्येष्ठ नगरसेवक यांच्या उपस्थितीत सभेचे कामकाज घ्यावे.

– राजू मिसाळ,  विरोधी पक्षनेता, पिंपरी पालिका