पाठय़पुस्तकांचे वितरण सुरू

पाठय़पुस्तकांच्या वितरणामध्ये पहिल्या टप्प्यात राज्याच्या दुर्गम भागात पुस्तकांचे वितरण होणार आहे

(संग्रहित छायाचित्र)

पुणे : समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत राज्य शासनातर्फे  दिल्या जाणाऱ्या पाठय़पुस्तके  आणि स्वाध्याय पुस्तिकांचे वितरण सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील दुर्गम भागात पाठय़पुस्तकांचे वितरण करण्यात येणार असून, उर्वरित ठिकाणीही पुस्तके  काही दिवसांत दिली जातील.

शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांच्या हस्ते पाठय़पुस्तक वितरणाचा प्रारंभ बालभारती येथे करण्यात आला. बालभारतीचे संचालक दिनकर पाटील, प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर टेमकर, बालभारतीचे नियंत्रक विवेक गोसावी आदी या वेळी उपस्थित होते. पाठय़पुस्तकांच्या छपाईसाठी आवश्यक असणाऱ्या कागदासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल झाल्यामुळे पुस्तक छपाईस विलंब झाला होता. हे प्रकरण निकाली निघाल्यानंतर पुस्तकांची छपाई करून वितरण सुरू करण्यात आले आहे.

पाठय़पुस्तकांच्या वितरणामध्ये पहिल्या टप्प्यात राज्याच्या दुर्गम भागात पुस्तकांचे वितरण होणार आहे. उर्वरित ठिकाणी देखील लवकरच पाठय़पुस्तके उपलब्ध होतील. बालभारतीने पहिली ते बारावीच्या सर्व पुस्तकांच्या पीडीएफ संके तस्थळावर मोफत डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. आतापर्यंत सुमारे १ कोटी ७८ लाख पुस्तके डाउनलोड झाली आहेत, असेही गायकवाड यांनी सांगितले.

प्रत्येक जिल्ह्य़ासाठी एक  वितरण प्रतिनिधी

पाठय़पुस्तकांच्या वितरणासंदर्भात प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्य़ासाठी एक प्रतिनिधी नियुक्त करावा, समन्वय राखून पाठय़पुस्तकांचे वितरण करावे, तालुकास्तरावर प्राप्त झालेली पाठय़पुस्तके  सुरक्षित राहतील याची काळजी घ्यावी, शाळा स्तरावर पाठय़पुस्तके  प्राप्त झाल्यावर विद्यार्थ्यांना पाठय़पुस्तकांचे वाटप करून त्याची नोंद करावी, करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना पाठय़पुस्तके  देताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, पुस्तकांच्या बांधणी, छपाईमध्ये दोष आढळल्यास संबंधित पुस्तके  प्रथम तालुकास्तरावर संकलित करावीत, जिल्ह्य़ातील पुस्तकांची तालुकानिहाय, विषयनिहाय यादी करून शिक्षणाधिकाऱ्यांनी बालभारतीला कळवून पुस्तके  बदलून घेण्याची कार्यवाही करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Distribution of textbooks started by state government zws