पुणे : केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कपात केल्याने यंदा दिवाळीच्या निमित्ताने वाहन क्षेत्राला चालना मिळाली आहे. या वर्षी वाहन खरेदी १० टक्क्यांनी वाढली आहे. आठ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत १३,३८७ नवीन वाहनांची नोंदणी झाली. गतवर्षी साधारण याच कालावधीत १२,२३५ वाहनांची नोंदणी झाली होती.

‘जीएसटी’त कपात करण्यात आल्याने दुचाकी वाहनांच्या किमती १० हजार ते १२ हजार रुपयांनी कमी झाल्या आहेत, तर चारचाकी वाहनांच्या किमतीतही ३५ हजार ते ४० हजारांनी फरक पडला आहे. दसऱ्याच्या दिवशी ९,५३१ वाहनांची नोंदणी झाली होती. दिवाळीला पाडव्याच्या मुहूर्तासाठी १३,३८७ वाहनांची नोंदणी झाली आहे.

ग्राहकांचा व्यावसायिक आणि दुचाकी वाहनांकडे कल वाढला आहे. गेल्या वर्षी दिवाळीत ७,९११ दुचाकींची नोंदणी झाली होती, तर ३६८ मालवाहतूक वाहने खरेदी करण्यात आली होती. यंदा त्यामध्ये दुपटीने वाढ झाली असून, ग्राहकांनी ६३५ मालवाहतूक वाहने खरेदी करण्यासाठी आगाऊ नोंदणी केली आहे, तर व्यावसायिक वापरासाठीच्या कार, कॅब, टॅक्सी या चारचाकी वाहनांसाठीही दुपटीने नोंदणी झाली असून, ४७१ चारचाकींची नोंदणी झाली आहे. यंदा खासगी चारचाकी वाहनांची नोंदणी मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाली आहे.

दिवाळीतील वाहन खरेदी

प्रकार – वर्ष २०२५ – वर्ष २०२४

दुचाकी – ८७६३ – ७९११

खासगी मोटार – २,७८६ – ३,११२

ऑटो रिक्षा – ५४६ – ४४१

व्यावसायिक मोटार – ४७१- २१८

मालवाहतूक – ६३५ – ३६८

बस – ४२ – २२

इतर – १४४ – १६३

एकूण १३,३८७ – १२,२३५

‘जीएसटी’ कपातीचा निर्णय झाल्यानंतर वाहन खरेदीला प्रतिसाद वाढला आहे. यंदाच्या दिवाळीत वाहन खरेदीसाठी गर्दी होत आहे. त्यामुळे वाहन क्षेत्राला मोठी चालना मिळाली आहे. किमती कमी झाल्याने ग्राहकांचा फायदा होत आहे. – चैतन्य सिन्नरकर, संचालक, अरिहन सुझुकी मोटर्स, पुणे</p>

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाहन खरेदीसाठी आगाऊ नोंदणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. वाहनांची क्रमांक पाटी मिळेपर्यंत ग्राहकांना वाहन देऊ नये, असे आदेश देण्यात आले आहेत. – स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे