पुणे : पादचारी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील एक लाख ९० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना शुक्रवार पेठेतील साठे काॅलनीत घडली. पसार झालेल्या चोरट्यांविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात एका महिलेच्या गळ्यातील दागिने बुलेटस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले.

याबाबत एका ज्येष्ठ महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६४ वर्षीय ज्येष्ठ महिला शुक्रवार पेठेतील साठे काॅलनीत राहायला आहेत. त्या शनिवारी (१८ ऑक्टोबर) सकाळी सहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे फिरायला बाहेर पडल्या होत्या. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेला अडवले आणि पत्ता विचारण्याचा बहाणा केला. महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून दुचाकीस्वार चोरट्यांनी गळ्यातील एक लाख ९० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलेने आरडाओरडा केला. चोरटे भरधाव वेगात पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे तपास करत आहेत.

बुलेटस्वार चोरट्यांनी पादचारी महिलेच्या गळ्यातील दीड लाखांचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना नगर रस्त्यावरील लोणीकंद भागात घडली. याबाबत एका महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ५७ वर्षीय महिला लोणीकंद भागात राहायला आहेत. त्या शुक्रवारी (१७ ऑक्टोबर) दुपारी पावणेचारच्या सुमारास लोणीकंदमधील थेऊर फाटा परिसरातून निघाल्या होत्या. त्यावेळी बुलेटवरुन आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. पोलीस उपनिरीक्षक तुकाराम सुरवसे तपास करत आहेत.

स्वारगेट, स्टेशन परिसरात मोबाइल हिसकावले

स्वारगेट आणि पुणे स्टेशन परिसरात दोघांचे मोबाइल संच हिसकावून नेण्यात आल्याच्या घटना घडल्या. याप्रकरणी स्वारगेट आणि बंडगार्डन पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वारगेट एसटी स्थानक परिसरात थांबलेल्या एका तरुणाच्या हातातील ४० हजार रुपयांचा मोबाइल संच हिसकावून नेल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत एका तरुणाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण मूळचा सोलापूरचा आहे. तो ४ ऑक्टोबर रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास स्वारगेट स्थानकासमोर थांबला होता. त्यावेळी दोन चोरट्यांनी तरुणाच्या हातातील मोबाइल संच हिसकावून नेला. तरुणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली असून, पोलीस उपनिरीक्षक निकीता पवार तपास करत आहेत. पुणे स्टेशन परिसरात एका तरुणाकडील मोबाइल संच हिसकावून नेल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत एका तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते तपास करत आहेत.