पुणे : ‘अभ्यासक्रमात पुराणकथांचा समावेश करून वैज्ञानिक दृष्टिकोन संपवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्रिभाषा धोरणाची सक्ती हा त्याचाच एक भाग आहे. आता कोणीही प्रश्नच विचारू नयेत म्हणून शहरी नक्षलवादाचा ठपका मारण्याचे षड्यंत्र आखण्यात आले आहे,’ अशी टीका आरोग्य सेनेचे अध्यक्ष डॉ. अभिजित वैद्य यांनी बुधवारी केली.
भाई वैद्य फाउंडेशन आणि आरोग्य सेनेच्या वतीने महात्मा फुले समता प्रतिष्ठानाच्या सरचिटणीस शारदा वाडेकर यांच्या हस्ते प्राचार्या नलिनी भाई वैद्य यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या ‘समाजाभिमुख संस्था’ आणि ‘शिक्षक राज्य पुरस्कारां’चे वितरण करण्यात आले. त्या वेळी वैद्य बोलत होते. फाउंडेशनच्या चिटणीस डॉ. गीतांजली वैद्य, विनायक शिंदे या वेळी उपस्थित होते. याच कार्यक्रमात पनवेल येथील शांतिवन येथील कुष्ठरोग निवारण समिती संचालित अण्णासाहेब सहस्रबुद्धे अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा वाकळी आणि क्रांती कृष्णा पाटील यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
डॉ. अभिजित वैद्य म्हणाले, ‘सध्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या नावाखाली झापडबंद शिक्षण लादले जात आहे. संवेदनशील आणि राष्ट्रप्रेमाने भारलेली पिढी घडवण्याऐवजी पैशांचा ओढा असलेली यांत्रिक पिढी तयार केली जात आहे. मराठी मातीचे मराठीपण पुसून हिंदी भाषेची सक्ती करण्यामागे धार्मिक कट-कारस्थानाचा वास येतो. एकीकडे सरकारी शाळा बंद पाडून शिक्षणाद्वारे विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊ पाहणाऱ्यांना अडथळे निर्माण करायचे, तर दुसरीकडे परदेशी विद्यापीठांसाठी पायघड्या घालायच्या, हा ढोंगी आणि दुटप्पीपणा सरकारने आता थांबवायला हवा.’
‘आजही गोरगरीब शिक्षणापासून दूर आहेत. खोटा इतिहास शिकवला जात असून, शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी जबाबदारीने वागणे आणि जागृत राहणे आवश्यक आहे,’ असे मत वाडेकर यांनी व्यक्त केले. अतुल रुणवाल यांनी प्रास्ताविक, तर प्रा. प्रमोद दळवी यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. केतन जाधव यांनी आभार मानले.
सर्वांना गुणवत्तापूर्ण आणि प्रगतीच्या समान संधी उपलब्ध करून दिल्या जातील, अशा शिक्षणाचे स्वप्न भाई वैद्य यांनी पाहिले होते. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करून सरकार पुन्हा एकाधिकारशाही व्यवस्था आणू पाहत आहे. इतिहासाची कोणी चिकित्सा करू नये म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या गोंडस नावाखाली झापडबंद शैक्षणिक व्यवस्था लादली जात आहे. – डॉ. अभिजित वैद्य, अध्यक्ष, आरोग्य सेना.