पुणे : मद्यप्राशन करुन वाहन चालविणे दोघांच्या अंगलट आले. न्यायालायने दोघांनी १५ दिवसांची साधी कैद आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांवर न्यायालयीन कारवाई व्हावी, यासाठी पाठपुरावा केला होता.
खडकी भागात मद्य पिऊन वाहन चालविणारा रोहित शैलेंद्र वर्मा (वय २९, रा. विद्यानगर, पिंपळे गुरव) याच्याविरुद्ध मोटार वाहन कायदा कलमांवन्ये खटला दाखल करण्यात आला होता. सोमवारी (२२ सप्टेंबर) शिवाजीनगर येथील मोटार वाहन न्यायालयात न्यायाधीश एस. बी. पाटील यांनी वर्माला दोषी ठरवून १५ दिवसांची साधी कैद आणि १२ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
नांदेड सिटी वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहनचालक राजकुमार मंगिणी कुलाळ (वय ३१, रा. मंगल भैरव सोसायटी, नांदेड सिटी) याच्याविरुद्ध खटला दाखल केला होता. या प्रकरणाची सुनावणी सोमवारी झाली कुलाळ यास १५ दिवसांची साधी कैद आणि दहा रुपये दंडाची शिक्षा देण्यात आली, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.
वाहतूक पोलिसांकडून सरकारी वकील म्हणून वर्षाराणी जाधव यांनी काम पाहिले. पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला, उपनिरीक्षक विकास पाटील यांनी खटल्याचे कामकाज पार पाडले.
नऊ महिन्यात चार हजार मद्यपींवर कारवाई
वाहतूक पोलिसांनी मद्यप्राशन करुन वाहने चालविणऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. मद्यपी वाहनचालकांडून गंभीर स्वरुपाचे अपघात घडतात. २२ सप्टेंबरर्यंत वाहतूक पोलिसांनी तीन हजार ९४८ मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करुन खटले दाखल केले आहे.
चोरट्याच्या ठशावरुन गुन्हा उघड, पसार चोरटा नाशिकमधून गजाआड
पुणे : कोरेगाव पार्क भागातील एका खासगी कंपनीत झालेल्या चोरीचा छडा गुन्हे शाखेच्या युनिट दोनने लावला. घटनास्थळी आढळून आलेल्या ठशांवरुन पोलिसांनी चोरट्यांचा माग काढला. या प्रकरणी एका चोरट्याला पोलिसांनी नाशिकमधून अटक केली.
रामनिवास मंजू गुप्ता (वय ३७, रा. महू, मध्यप्रदेश, सध्या रा. विठ्ठलवाडी, ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. बंडगार्डन रस्त्यावरील वाडिया महाविद्यालयाजवळ असले्लया एका व्यावसायिक संकुलातील कार्यालयात ३ जुलै रोजी चोरी झाली होती. पोलिसानी घटनास्थळी भेट दिली. अंगुल मुद्रा तज्ज्ञांनी (फिंगर प्रिंट एक्सपर्ट) घटनास्थळाची पाहणी केली.
घटनास्थळावरुन चोरट्याचे ठसे संकलित करण्यात आले. या ठशांचे विश्लेषण करण्यात आले. खासगी कार्यालयात चोरीचा गुन्हा गुप्ता याने केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. तो नाशिक परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक तेथे रवाना झाले. सापळा लावून त्याला ताब्यात घेण्यात आले. गुप्ता याच्याविरुद्ध घरफोडीचे ५० हून जास्त गुन्हे दाखल आहे. त्याने पुण्यात कोरेगाव पार्क आणि येरवडा भागात चोरीचा गुन्हा केल्याचे तपासात उघड झाले आहे.
गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, सहायक निरीक्षक अमोल रसाळ, ओम कुंभार, संजय आबनावे, विनायक वगरे यांनी ही कामगिरी केली.