लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : राज्यातील ३६ पैकी १३ जिल्ह्यांत दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. १३ जिल्ह्यांत एक जून ते १८ सप्टेंबर या काळात पडणाऱ्या सरासरी पावसात २० टक्क्यांहून जास्त तूट आली आहे. नगर, सांगली, सातारा, जालना, बीडमध्ये पडणाऱ्या पावसात ४० टक्क्यांहून जास्त तूट निर्माण झाल्यामुळे टंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे तातडीने दुष्काळी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एक जून ते १८ सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीचा विचार करता सरासरीपेक्षा नऊ टक्के कमी पाऊस पडला. या काळात सरासरी ९२७.९ मिमी पाऊस पडतो, प्रत्यक्षात ८४५.४ मिमी पाऊस झाला आहे. नगर, सांगली जिल्ह्यांत सरासरीच्या ४५ टक्के कमी, साताऱ्यात सरासरीच्या ४० टक्के कमी, छत्रपती संभाजीनगरमध्ये सरासरीच्या २७ टक्के कमी, जालन्यात सरासरीच्या ४३ टक्के कमी, नांदेडमध्ये सरासरीच्या १९ टक्के कमी, अमरावती सरासरीच्या ३० टक्के कमी, वाशिममध्ये सरासरीच्या २२ टक्के कमी, सोलापुरात सरासरीच्या ३५ टक्के कमी, बीडमध्ये सरासरीच्या ४३ टक्के कमी, धाराशिवमध्ये सरासरीच्या ३२ टक्के कमी, परभणीत सरासरीच्या ३१ टक्के कमी आणि अकोल्यात सरासरीच्या २९ टक्के कमी पाऊस झाला आहे.

आणखी वाचा-पुणे : गणेशोत्सवाच्या काळात महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मिळणार विनामूल्य औषधोपचार

मराठवाड्यात २२, मध्य महाराष्ट्रात १९ टक्के तूट

विदर्भात सरासरीपेक्षा सात टक्के कमी पाऊस झाला आहे. सरासरी ८९४.१ मिमी पाऊस अपेक्षित असताना, ८२७.४ मिमी पाऊस झाला. मराठवाड्यात सरासरीपेक्षा २२ टक्के कमी पाऊस झाला आहे. ५७९.३ मिमी सरासरी पाऊस पडतो. प्रत्यक्षात ४५२ मिमी पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा १९ टक्के कमी पाऊस पडला आहे. सरासरी ६७७.४ मिमी पाऊस पडतो, प्रत्यक्षात ५४६ मिमी पाऊस झाला आहे. कोकणात सरासरीपेक्षा सहा टक्के जास्त पाऊस पडला असला, तरीही रत्नागिरीत सरासरीपेक्षा पाच आणि मुंबई शहरात सरासरीपेक्षा आठ टक्के कमी पाऊस पडला आहे.

आठ जिल्ह्यांत सरासरी गाठली

राज्यातील आठ जिल्ह्यांनी पावसाची सरासरी गाठली आहे. पालघरमध्ये सरासरीच्या १९ टक्के, रायगडमध्ये ९ टक्के, मुंबई उपनगरांत २८ टक्के, ठाण्यात २५ टक्के, नांदेडमध्ये १९ टक्के, बुलडाण्यात एक टक्का, गडचिरोलीत तीन आणि यवतमाळमध्ये सरासरीपेक्षा सात टक्के जास्त पाऊस झाला आहे. सरासरीच्या १९ टक्के कमी आणि अधिक पाऊस सरासरी इतकाच गृहीत धरला जातो.

आणखी वाचा-आगामी पुणे लोकसभा निवडणुकीत १५०० मतदारांसाठी होणार एक केंद्र… जाणून घ्या मतदान केंद्रांची रचना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढील दिवस पावसाची उघडीप?

कमी दाबाचे क्षेत्र राजस्थानकडे निघून गेल्यामुळे आणि राज्यात मोसमी पाऊस पडण्यास पोषक स्थिती नसल्यामुळे राज्यभरात पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील पाच दिवस मोसमी पाऊस राज्यात उघडीप देण्याचा अंदाज आहे. अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर हलक्या सरी पडण्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पावसाचा हा खंड पाच दिवसांहून जास्त वाढल्यास टंचाईची स्थिती आणखी गंभीर होऊ शकते.